ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; तिसऱ्या टी-20 सामन्यातही पाकवर केली मात

यजमान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व अखेरच्या टी-20 क्रिकेट सामन्यात 7 विकेट्स आणि 52 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. आधी अचूक गोलंदाजी आणि नंतर मार्कस स्टॉयनिसची नाबाद अर्धशतकी खेळी ही ऑस्ट्रेलियाच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिकेत 3-0 फरकाने बाजी मारत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. स्टॉयनिस या सामन्याचा मानकरी ठरला, तर स्पेन्सर जॉन्सनने मालिकावीराचा बहुमान मिळविला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर सलग सातव्यांदा टी-20 सामन्यात मात केली.

स्टॉयनिसची देदणादण फटकेबाजी

पाकिस्तानकडून मिळालेले 118 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शाहिन शाह आफ्रिदीने मॅथ्यू शॉर्टला (2) झटपट बाद करून पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. जॅक फ्रेझर मॅकगर्कही 18 धावांवर बाद झाला. मग कर्णधार जोस इंग्लिस (27) व मार्कस स्टॉयनिस (नाबाद 61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूंत 55 धावांची भागीदारी केली. स्टॉयनिसने 27 चेंडूंत नाबाद 61 धावांची खेळी सजविताना 5 चौकार व तितक्याच षटकारांचा घणाघात केला. टीम डेव्हिडने 7 धावांवर नाबाद राहत त्याला साथ दिली. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी, जहाँदाद खान व अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

एकटा बाबरच लढला

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 18.1 षटकांत 117 धावांवरच संपुष्टात आला. त्यांच्याकडून एकटा बाबर आझमच लढला. त्याने 28 चेंडूंत 4 चौकारांसह 41 धावांची खेळी केली. त्यानंतर हसीबुल्लाह खान (24), इरफान खान (10) व शाहिन शाह आफ्रिदी (16) हेच दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन हार्डीने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले. स्पेन्सर जॉन्सन व अॅडम झम्पा यांना गडी बाद केले, तर झेव्हियर बार्टलेट व नाथन इलिस यांना 1-1 बळी मिळाला.