ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत विजयासाठीचा संघर्ष आता शेवटच्या दिवसावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदकतेमुळे हिंदुस्थानने एमसीजीवर आपली पकड मजबूत केली होती. मात्र 6 बाद 91 अशा घसरगुंडीनंतरही ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने हिंदुस्थानी गोलंदाजांना चकवत संघाची मजल दिवसअखेर 9 बाद 228 पर्यंत ताणत आपली आघाडी 333 पर्यंत वाढवली आहे. विजयासाठी ऑस्ट्रेलियाप्रमाणे हिंदुस्थानही जोर लावत असल्यामुळे विजयाचे फळ कुणाच्या पदरात पडेल ते शेवटच्या दिवसाच्या थरारसोहळय़ावर अवलंबून आहे. मात्र जो एमसीजीवर विजयाचे फळ चाखेल तोच जागितक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या शर्यतीत टिकेल, हे निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेने आज पाकिस्तानचा अवघ्या दोन विकेटनी पराभव करत डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत सर्वप्रथम धडक मारल्यामुळे हिंदुस्थानला विजयाशिवाय पर्याय उरलेला नाही.
शनिवारी नितेशकुमार रेड्डीने दिवस गाजवला होता तर आज जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज या वेगवान जोडगोळीने भेदक मारा करीत ऑस्ट्रेलियाची आघाडीची (मार्नस लाबुशन वगळता) आणि मधली फळी कापून काढली होती. मेलबर्नवरील या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमानांची एकवेळ 6 बाद 91 अशी दुर्दशा झाली होती, मात्र कांगारूंच्या शेपटाने हिंदुस्थानी गोलंदाजांना तंगविले म्हणून ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लांबला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नॅथन लायन 41, तर स्कॉट बोलॅण्ड 10 धावांवर खेळत होते. बुमराने 4, तर सिराजने 3 विकेट टिपल्याने हिंदुस्थानला लढतीत पुनरागमन करता आले. मात्र, कांगारूंचे शेपूट वळवळल्याने आणि जैसवालने तीन हलवा झेल सोडल्याने यजमानांचा दुसरा डाव लांबला.
बुमरा-सिराजचा अचूक मारा
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज या वेगवान जोडगोळीने बॉक्सिंग डे कसोटीत पुनरागमन करून दिले होते. बुमराने पहिल्या डावातील अर्धशतकवीर सॅम कॉन्स्टासचा (6) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाचा (21) त्रिफळा उडवला व पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्हन स्मिथला (13) यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कापून काढली.
कमिन्स, लॉयनची झुंजार फलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा डाव संकटात असताना कर्णधार पॅट कमिन्स (41) व नॅथन लायन (खेळत आहे 41) या गोलंदाजांनी झुंजार फलंदाजी करत हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. कमिन्सने 90 चेंडूंत 41 धावा करताना 4 चेंडू सीमापार पाठविले. रवींद्र जाडेजाने त्याला रोहितकरवी झेलबाद केले. त्यानंतर लॉयन व स्कॉट बोलॅण्ड या अखेरच्या जोडीने 55 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानच्या आशेवर पाणी फेरले. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराने 7 निर्धाव षटकांसह 56 धावांत 4 फलंदाज बाद केले, तर मोहम्मद सिराजने 4 निर्धाव षटकांसह 66 धावांत 3 विकेट टिपले. 14 षटके गोलंदाजी केलेल्या जाडेजाला एक विकेट मिळाली.
हिंदुस्थानची 11 धावांची भर
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानचा पहिला डाव 119.3 षटकांत 369 धावांवर संपुष्टात आला. हिंदुस्थानने तिसऱया दिवसाच्या 9 बाद 358 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र आणखी 11 धावांची भर घालून हिंदुस्थानचा पहिला डाव संपला. नाथन लॉयनने नितीशकुमार रेड्डीला 114 धावांवर स्टार्ककरवी झेलबाद करून हिंदुस्थानचा पहिला डाव संपविला, तर मोहम्मद सिराज 4 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलॅण्ड व नाथन लॉयन यांनी प्रत्येकी 3 विकेट टिपले.
झेल सोडा अन् रडा!
हिंदुस्थानी गोलंदाजांनी दुसऱया डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजीची हवा काढून घेतली होती. टीम इंडियाचा आशा पल्लवीत झालेल्या असतानाच यशस्वी जैसवालने तीन सोपे झेल सोडल्याने रोहित शर्माच्या सेनेवर रडायची वेळ आली. ऑस्ट्रेलियाची 6 बाद 99 अशी अवस्था असताना आकाश दीपच्या गोलंदाजीवर जैसवालने सलामीवीर मार्नस लाबूशेनचा झेल सोडला. लाबूशेनने या संधीचा फायदा उठवित मालिकेतील आपले तिसरे अर्धशतक साजरे केले. जैसवालने त्याआधी तिसऱयाच षटकात उस्मान ख्वाजाचा झेल सोडला होता. त्यावेळी ख्वाजा केवळ 2 धावांवर खेळत होता. मग त्याने सिराजच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी 19 धावा केल्या. त्यानंतर जैसवालने चहापानापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचाही तो 20 धावांवर असताना सिली पॉइंटला झेल सोडला. एकाच खेळाडूने तीन झेल सोडल्याने एरवी शांत राहणारा कर्णधार रोहित शर्माही चांगलाच भडकला होता.
मधल्या फळीचा फ्लॉप शो
सिराजने आघाडीची फळी कापून काढल्यानंतर बुमराने मधल्या फळीला भगदाड पाडले. त्याने बर्थ डे बॉय ट्रव्हिस हेड (1), मिचेल मार्श (0) व अॅलेक्स पॅरी (2) या धोकादायक फलंदाजांना मामू बनविले अन् ऑस्ट्रेलियाची 36 षटकांत 6 बाद 91 अशी दाणादाण उडाली. हेडने नितीशकुमारकडे झेल दिला, तर मार्श यष्टीमागे पंतकरवी झेलबाद झाला. पॅरीची तर दांडी कशी गुल झाली हे त्यालाही कळले नाही. त्यानंतर आलेल्या मिचेल स्टार्कला (5) नितिशकुमारच्या थ्रोवर यष्टिरक्षक पंतने दुसऱया बाजूला जबरदस्त थ्रो करीत धावबाद केले, ते काबिले तारीफच होय. मधल्या फळीच्या या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाने मेलबर्न कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले.
एक बुमरा, अनेक विक्रम!
जसप्रीत बुमराने रविवारी ट्रव्हिस हेडचा विकेट टिपताच अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने 148 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 20 हून कमी सरासरीने 200 विकेट टिपण्याचा नवा विश्वविक्रम केला. त्याने वेस्ट इंडीजचे महान गोलंदाज माल्कम मार्शलचा विक्रम मोडीत काढला. 200 विकेट घेणाऱया वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह 19.5 सरासरीसह पहिल्या स्थानी आहे. त्याच्याखालोखाल माल्कम मार्शल (20.9 सरासरी), जोएल गार्नर (21.0 सरासरी) आणि कर्टली अॅम्ब्रोज (21.0 सरासरी) हे दिग्गज गोलंदाज आहेत. याचबरोबर 44 कसोटी सामन्यांत 200 विकेटचा टप्पा गाठणारा बुमरा हा हिंदुस्थानचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. त्याने कपिल देव (50 कसोटींत 200 विकेट) यांचा विक्रम मोडीत काढला. फिरकीपटू रवींद्र जाडेजानेही 44 कसोटींत 200 विकेट टिपले होते. बुमराने जाडेजाच्या या विक्रमाची बरोबरी केली. रविचंद्रन अश्विनने 37 कसोटींत 200 विकेटचा टप्पा गाठला असून याबाबतीत तो नंबर वन गोलंदाज आहे. सर्वात कमी चेंडूंत 200 कसोटी विकेट मिळविणाऱया गोलंदाजांच्या यादीत बुमरा चौथ्या स्थानी आहे. त्याने 8484 चेंडूंत 200 विकेट टिपले. याबाबतीत पाकिस्तानचा वकार युनूस पहिल्या स्थानावर असून त्याने 7725 चेंडूंत 200 विकेट टिपले होते. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने 7848 चेंडूंत, तर त्याचाच देशसहकारी पॅगिसो रबाडाने 8154 चेंडूंत 200 कसोटी विकेट टिपले होते. शिवाय मेलबर्नवर सर्वाधिक 23 कसोटी विकेट टिपणारा आशियातील गोलंदाजांचा विक्रमही बुमराच्या नावावर जमा झाला. त्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज सरफराज खानचा (4 सामन्यांत 22 विकेट) विक्रम मागे टाकला.