सिनेमा – औरों मे कहां दम था

>> प्रा. अनिल कवठेकर

आजच्या प्रेम आणि ब्रेकअपच्या अतिफास्ट काळातील एक असा चित्रपट “औरों में कहां दम था’’ जो प्रेमाचा खरा अर्थ आपल्यासमोर उलगडून सांगतो. कोणत्याही कल्पक प्रतीकांचा वापर न करता साकारलेली ही एक सरळ प्रेमकथा संवादामधले निशब्दपण सहज भरून काढते. अजय देवगणच्या ‘दिलजले’ या चित्रपटातला हा शेर आहे.

‘हमे तो अपनों ने लूटा, गैरों मे कहां दम था
मेरी कश्ती वहां डुबी जहां पानी कम था’
अजय देवगण हा अ‍ॅक्शन हिरो म्हणून सगळ्यांना आवडतो. अ‍ॅक्शनची त्याची स्वतची स्टाईल आहे. जी दमदार आहे. ‘सिंघम’मध्ये तो भाव खाऊन जातो; पण अभिनयाच्या बाबतीत तो फार वेगळं करताना दिसत नाही. तरीही हा शेर त्याने ज्या पद्धतीने पेश केला आहे, तो खास आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून लक्षात येतं की, इथे नेमकं कोणामुळे काहीतरी बिघडलेलं आहे. शेवटी ते उलगडतं.

‘औरो मे कहा दम था’ या चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की आजच्या प्रेम आणि ब्रेकअपच्या अतिफास्ट काळात एक असा चित्रपट, जो प्रेमाचा खरा अर्थ आपल्यासमोर उलगडून सांगतो. प्रेम म्हणजे केवळ दोन जिवांनी विवाहासाठी एकत्र येण्याची केलेली सुरुवात नव्हे; तर प्रेम म्हणजे आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो त्याला सुखात, आनंदात, समाधानात, सुरक्षित ठेवणं आणि त्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान देणं.

वरळीचा समुद्रकिनारा म्हणजे प्रेमिकांना भेटण्याचं ठिकाण. पडद्यावर एक पूल दिसतो. जो दोन्ही बाजूने बांधत आणलेला आहे. मधला भाग जोडायचा राहिलाय. तिथे एक तरुण आणि तरुणी बसलेले आहेत. त्यांचा संवाद चाललाय. नायिका विचारते, आपल्या दोघांना कोणी वेगळं करू शकतो का? नायक म्हणतो, वो अभी तक पैदा नही हुआ है. मै आग लगा दूंगा.’ पुलाचं प्रतीक दाखवून दिग्दर्शकाने चित्रपटाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या; पूल जोडला जातो. पण या दोघांच्या प्रेमाचा पूल मात्र अर्धवटच आहे. नंतर मात्र चित्रपट एक प्रेमकथा म्हणूनच पुढे येतो. कोणत्याही कल्पक प्रतीकांचा उपयोग पुढे केलेला दिसत नाही.

खरं तर चित्रपटाची लांबी मर्यादित करून अशा प्रतीकाच्या माध्यमातून खऱया प्रेमाच्या अनेक छटा दिग्दर्शकाला निश्चितपणे दाखवता आल्या असत्या. कारण चित्रपटाच्या कथेमध्ये चित्रपटाला देव आनंदच्या ‘गाईड‘सारखे बनण्याचे कथाबीज होते. या चित्रपटातील नायक प्रेमिकेने नाकारल्यानंतर रडकी गाणी म्हणत बसत नाही. जे केलेलं आहे ते त्याने मनापासून स्वीकारलेलं आहे. त्याची कोणतीही खंत त्याच्या मनाला नाही. ती आनंदात आहे. यातच त्याचा खरा आनंद आहे. तिने तिचं करिअर करावं यात त्याचा आनंद आहे. तिने त्याला भेटायला येऊ नये अशी अट त्याने घातलेली आहे. जिच्यावर तो प्रचंड प्रेम करतो तिला पाहायचंच नाही. हा त्याचा त्याग आहे. तो तिच्या आठवणीमध्ये रंगतो, रमतो; पण तो आसवे ढाळत नाही. दारू पीत बसत नाही.

त्यानंतर पूल तयार झालेला आहे आणि जेलमध्ये कृष्णा (अजय देवगन) दिसतो. पण आत्तापर्यंत दिसलेला तो कृष्णा हा नाही. हा तर अजय देवगन आहे. त्याच्या तरुणपणाची भूमिका शंतनू महेश्वरी याने केलेली आहे. खरं तर शंतनु आणि सई मांजरेकर या दोघांच्या वाट्याला तसा निम्मा निम्मा चित्रपट आलेला आहे. दोघेही कुठेच कमी पडलेले नाहीत. यात आणखी एक धागा आहे तो म्हणजे तब्बू (वसुधा) आणि अजय देवगन (कृष्णा) यांच्या प्रेमाचा. (तब्बू खऱया जीवनात अजय देवगनच्या प्रेमात होती आणि तिने त्याच्यासाठी विवाह केलेला नाही)त्यांच्या या विफल प्रेमाच्या कथेचा धागा पकडूनच या चित्रपटाची निर्मिती केली आहे, असं वाटतं.

जेलमध्ये नव्याने एकजण येतो. दादागिरी करत तो सगळ्यांनाच त्रास देतो. कृष्णा एका कोपऱयात जेवण करत बसलेला असतो. दादागिरी करणारा त्यालाही तिथून हाकलतो. क्षणभर आपल्याला असं वाटतं की आता इथे हाणामारी होईल; पण कृष्णा त्याला काही करत नाही. मुकाट्याने जागा सोडून निघून जातो. त्या वार्डात असणारे दोन वाढप्यांपैकी म्हातारा वाढपी विचारतो की, कृष्णाने चष्मा काढला का? तो जेव्हा चष्मा काढतो तेव्हा तो समोरच्याला यथेच्छ बदडतो. असा अनुभव त्या वृद्ध वाढप्याला आहे; पण यावेळी कृष्णा चष्मा काढत नाही. अशा पद्धतीच्या मांडणीने प्रेमकथेमधील कृष्णाच्या मानसिकतेची जडणघडण स्पष्ट होते. कृष्णाने दोन मर्डर केलेले आहेत आणि तो पंचवीस वर्षांकरता तुरुंगात आला आहे. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची थोडी लवकर सुटका होणार आहे. पण त्याने मला सोडू नका असा अर्ज केला आहे. त्याला वकिलाने विचारल्यानंतर तो सांगतो, बाहेर राहण्यास अजून माझ्या मनाची तयारी झालेली नाही.

‘दोन मर्डर तू का केलेस? ती मुलगी तुला कधीही भेटायला आलेली नाही. फोन नाही. चिट्ठी नाही. काही नाही. मग काय फायदा? वकील म्हणतो.’
‘हर बात मे फायदा नुकसान नही देखते सर.’
बाहेर पडल्यावर जायचं कुठे हा प्रश्न त्याच्या समोर आहे. त्याला बाहेर जायचं नाही म्हणून तो एकाने त्याला मारलेलं असतं त्याला मारतो. त्याच्या पहाऱ्यावर असलेला इन्स्पेक्टर म्हणतो, तुला बाहेर जायचं नाही, कारण तुला खात्री नाही की ती तुला भेटेल की नाही. मला माहीत आहे, ती कधीच येणार नाही. त्याला या देशात राहायचं नाही. तो दुबईला जाण्याच्या प्लॅनमध्ये आहे.

तिचे नाव वसुधा (तब्बू) आहे. त्यानेच तिच्याकडून वचन घेतलंय की, तिने त्याला जेलमध्ये भेटायला येऊ नये. साधारण पंचवीस मिनिटांनंतर फ्लॅशबॅकमध्ये कृष्णाची आणि वसुधाची गोष्ट आपल्याला दिसते. दहीहंडी, दिवाळी, होळी… होळीमध्ये एकमेकांना रंग लावणं… हे सगळं आठवताना रात्र उजाडते आणि तो जेलच्या बाहेर पडतो. त्याचा मित्र त्याला इराण्याच्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. त्याला हॉटेलमधल्या आठवणी दिसू लागतात. त्या हॉटेलमध्ये झालेली हाणामारी… एकता चाळ… त्या चाळीतले मित्र त्यांच्या ओळखीचे… या सगळ्यांच्या आठवणीत तो रंगतो. त्या आठवणीत रंगणे हाच त्याचा स्वभाव आहे. तो कुढत नाही. स्वतला दोष देत नाही. त्याला कसलाही पश्चाताप नाही. हेच चित्रपटाच्या नायकाचं स्वभाववैशिष्टय़ आहे. जे जगण्यामध्ये आपणही बऱयाच वेळा स्वीकारलेलं आहे; पण ते तितकंच कठीणसुद्धा आहे.

ही कृष्णा आणि वसुधा या दोघांची प्रेमकथा; पण या प्रेमकथेचं वेगळेपण आहे. त्याने 25 वर्षं तुरुंगात काढलेली आहेत आणि तिने आपला संसार थाटलेला आहे. तो केवळ तिच्या आठवणीच्या सोबत आनंदात रंगतो. त्याला तिच्याबद्दल अजिबात राग नाही. तुरुंगातून सुटलेल्या कृष्णाला त्याच्या त्या जुन्या चाळीत परत जायचंय… थोडय़ा वेळासाठी… पुन्हा त्याचं तरुणपण आठवण्यासाठी! आठवणींचा मोहोळ कृष्णाच्या मनामध्ये उठतो. इलेक्ट्रिक बोर्डामध्ये त्याने ठेवलेली अंगठी शोधतो. पण नवीन वायरिंग झाल्याने मिळत नाही. त्याच्याकडे फक्त आठवणींचा अल्बम आहे. दोघांमध्ये संवाद नाही. ज्यावेळेस संवाद आहेत त्या संवादामध्ये गांभीर्य आहे. एकमेकांकडे पाहतात तेव्हा अभिनयात तब्बू भारी पडते. अजय इतक्या प्रभावीपणे त्या भावना डोळ्यातून व्यक्त करू शकत नाही.

ती विचारते, ‘कैसे हो…’
तो म्हणतो, ‘कन्फ्युज हूं, अच्छा हूं के बहुत अच्छा हूं..’ त्याच्या उत्तराचा अर्थ लागणं कठीण आहे.
तो तिला म्हणतो, ‘तुझ्या प्रत्येक प्रश्नाची पाच उत्तरं माझ्याकडे आहेत.’
ती म्हणते, ‘मी आठवत होते की त्या पाचपैकी एकाचं उत्तर दे..’
तो म्हणतो, ‘तू विचारलेला प्रश्न आऊट ऑफ सिलॅबस आहे.’
या प्रश्नोत्तरातून खूप काही समजण्यासारखं आहे. सांगण्यासारखं नाही.

समुद्रालगतच्या रस्त्यावर दोघांचा संवाद होतो. तो रस्ता संपलेला आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहे. त्यांचं बोलणं तुटक आहे. तिच्या नवऱ्याला तिचा इतिहास ठाऊक आहे. ती त्याला आपल्या नवऱ्याला भेटायला घेऊन जाते. तिचं घर मोठं आहे. तिचा नवरा अभिजीत प्रामाणिक आहे. कृष्णाला त्यानेच जेलमधून बाहेर काढलेलं आहे. कृष्णाने बाहेर यावं म्हणून तो पाच वर्षांपासून प्रयत्न करत असतो. वसुधाने याच अटीवर त्याच्याशी लग्न केलेलं असतं. अभिजीत आणि कृष्णाचा संवाद चालू असतानाच वसुधाला ऑफिसमध्ये जावं लागतं आणि दोघेजण एकमेकांशी बोलत बसतात. कृष्णाला मोकळेपणाने बोलता यावं म्हणून अभिजीतने मुद्दाम हा डाव आखलेला असतो. त्या रात्री नेमकं काय झालं हे अभिजीतला वसुधाने सांगितलेलं आहे. पण तरीही अभिजीतला कृष्णाकडून ते जाणून घ्यायचं आहे. अभिजीत पुन्हा एकदा त्याला विचारतो, त्या रात्री नेमकं काय झालं. तोच या चित्रपटाचा खरा सस्पेन्स आहे.

तेवढय़ात जिग्नेशचा फोन येतो. जिग्नेश कृष्णाचा जवळचा मित्र. आपल्याला निघायला हवं. फ्लाईटची वेळ झालेली आहे. दोघे खाली उतरतात. तिचा नवरा वरून पाहात असतो. पहिल्यांदा ती कृष्णाला मिठी मारते. या मिठीत पंचवीस वर्षांच्या प्रेमाचा सार भरलेला असतो. चित्रपटात एकमेव मिठी कृष्णा आणि वसुधाची आहे. प्रेमाचं सात्त्विक रूप. ही एक वेगळी प्रेमकथा आहे. ज्या पूर्वी कथा-कादंबऱ्यांमध्ये आपण वाचलेल्या असतील. प्रेम असंही असू शकतं हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)