कारवाईचा बडगा उगारताच खेडकर कुटुंबाने बंगल्याबाहेरील अतिक्रमण काढले

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील कुटुंबीयांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविले आहे. अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस पुणे महापालिकेने दिली होती. त्यानंतर खेडकर कुटुंबीयांकडून स्वतःहून बंगल्याबाहेरील अतिक्रमण हटविले.

 आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येत असताना त्यांच्या कुटुंबीयांच्या बाणेर येथील ‘ओम दीप’ बंगल्याच्या बाहेर अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर आले होते. बंगल्याबाहेरील पदपथावर झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी पालिकेने खेडकर कुटुंबीयांना नोटीस बजावली होती. 7 दिवसांच्या आत अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या नोटिसीमध्ये म्हटले होते. अखेर स्वतः खेडकर कुटुंबीयांनी आज बंगल्याबाहेरील अतिक्रमण हटवले.

महापालिकेच्या पथकाकडून बाणेर रस्त्यावर असलेल्या पूजा खेडेकरांच्या बंगल्याची पाहणी करण्यात आली होती. या बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचा इशार देण्यात आला होता. रस्त्यावर बेकायदा अतिक्रमण करून सुशोभीकरण करण्यात आले होते. या प्रकरणी पालिकेच्या पथ विभागाने नोटीस दिली होती. त्यानंतर खेडकर कुटुंबीयांनी हे अतिक्रमण काढून घेतले आहे.