
>>प्रभा कुडके
देशभरातील बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची (Chhava) त्सुनामी असताना सोशल मीडिया, पुस्तक विक्रीवरही ‘छावा’चे गारुड पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना वाचक बनविण्यात आता ‘छावा’ चित्रपटाचा हातभार लागला आहे. ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर पडलेली पावले आता कादंबरीच्या शोधात फिरत आहेत. ‘छावा’ कादंबरी वाचण्यासाठी प्रेक्षक वर्ग विविध माध्यमांतून कादंबरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत आहे. त्यामुळेच सगळीकडे ‘छावा’ची हवा असल्याची अनुभूती होत आहे.
‘छावा’ ही कादंबरी प्रख्यात लेखक शिवाजी सावंत (shivaji sawant) यांच्या लेखणीतून साकारली आहे. ही कादंबरी 28 एप्रिल 1971 साली प्रथम प्रकाशित करण्यात आली होती. संभाजी महाराजांवरील जीवनपटावर आधारित ही कादंबरी त्या काळी प्रतापगडावरील भवानी मंदिरात प्रकाशित करण्यात आली होती. ‘छावा’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा या कादंबरीसाठी पुस्तकांच्या दुकानात गर्दी केली आहे. दैनिक ‘सामना’सोबत बोलताना ‘आयडियल बुक डेपो’चे मंदार नेरुरकर यांनी ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ही कादंबरी विकत घेण्याची मागणी 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले.
‘छावा’ कादंबरीचे ऑडियो बुक्सवरही ‘छावा’चा बोलबाला सुरू झालेला आहे. या प्लॅटफॉर्मवर छावा ऐकणारे वाढले आहेत. ऑनलाइन विक्री करणाऱ्या अनेक साईटवरती ‘छावा’ कादंबरी घरपोच मिळण्याची मागणी वाढली आहे. ‘छावा’ कादंबरी मराठीसह हिंदीतही भाषांतरित झालेली आहे.
स्टोरी टेलचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑडियो बुक्समध्ये ‘छावा’ या कादंबरीला आधीपासूनच मोठय़ा प्रमाणात मागणी होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ही मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. ऑडियो बुक्स वाचणारा वयोगट 24 ते 40 वर्षे असा आहे. तरुणांना प्रेरणा देणारी ही कादंबरी आहे.
View this post on Instagram