Indian Street Premier League (ISPL) च्या दुसऱ्या हंगामासाठी झालेल्या नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. दमदार संघ तयार करण्यासाठी सहा संघांमध्ये चढाओढ पहायला मिळाली. या लिलाव प्रक्रियेत अभिषेक दल्होर 20.50 लाखांच्या किमतीसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. दुसरा हंगाम 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मुंबईतील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणार आहे.
मुंबईत झालेल्या रोमांचक मेगा लिलावात 350 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. हे खेळाडू 55 शहरांमधून निवडले गेले होते. लिलाव प्रक्रियेत सहा संघांनी एकूण 96 खेळाडूंची निवड केली. अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माझी मुंबई संघाने 3 लाखांच्या बेस प्राइसवरून थेट 20.50 लाखांची प्रभावी बोली लावत अभिषेक कुमार दल्होर याला खरेदी केले. अभिषेक दल्होर स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लिलावातील सर्वात तरुण 15 वर्षीय खेळाडू शारिक यासिर याला अक्षय कुमारच्या मालकीचा श्रीनगर के वीर या संघाने 3 लाखांत खरेदी केले. 16 सदस्यीय संघांसाठी खेळाडू निवडताना चुरस संघ मालकांमध्ये चुरस पहायला मिळाली. लिलाव संपता-संपता सहा फ्रँचायझींनी 5.54 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती.
या वर्षीच्या लिलावात प्रथमच राइट-टू-मॅच (RTM) आणि आयकॉन प्लेयर नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. संघांना त्यांच्या संघात एका आयकॉन खेळाडूचा समावेश करण्याची परवानगी देण्यात आली, तसेच RTM नियमांतर्गत मागील हंगामातील दोन खेळाडूंना संघात राखून ठेवण्याचा पर्यायही उपलब्ध करुण देण्यात आला होता.