या सरकारला राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत नाही, नागपूर अपघातावरून अतुल लोंढे यांनी सरकारला फटकारले

नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या गाडीने जवळपास चार ते पाच गाड्यांना धडक दिली, या धडकेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून ती गाडी संकेत बावनकुळे याच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप व बावनकुळेंवर टीका केली आहे.

”काल भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले. मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था भाजपाच्या दावणीला बांधलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत या सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल. आता जनताच या सरकारला उत्तर देईल”, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

”सत्ताधारी धनदांडग्यांच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या पोरांसाठी सामान्यांचा जीव स्वस्त झाला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गाडीचा मालक कोण आहे हे माहीत असतानाही त्याच्यावर अरेस्ट होऊन कारवाई का होत नाही? पोलिसही यात लपवाछपवी करत आहेत”, असेही अतुल लोंढे म्हणाले.