ईव्हीएममधील फेरफाराबाबत लवकरच गौप्यस्फोट करू – अतुल लोंढे

सत्तेच्या जोरावर सर्व यंत्रणा हाताशी धरून ईव्हीएमच्या मदतीने देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱया सत्ताधाऱयांच्या विरोधात येत्या काळात देशभरात काँग्रेस आंदोलन करणार आहे. तसेच लवकरच ईव्हीएम यंत्रणेतील फेरफाराबाबत मोठा गौप्यस्फोट करू, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मारकडवाडीला भेट दिल्यानंतर पुण्यात लोंढे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कोणालाही राज्यातील निकालावर विश्वास बसत नाही. माढा मतदारसंघातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांचा बॅलेट  पेपरवर मतदान घेण्याचा लोकशाहीतील अधिकार हिरावून घेतला, असे लोंढे म्हणाले. बॅलेट पेपरवर प्रतीकात्मक मतदान घेण्याच्या मारकडवाडीतील ग्रामस्थांच्या प्रयोगाची देशभर चर्चा झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मारकडवाडीतील नागरिकांना पाठिंबा दर्शविला.