विशेष – ‘अपडेट’ कल्लोळाचा शोध आणि बोध

>> अतुल कहाते

मापोसॉफ्टच्य क्राऊडस्ट्राईक अपडेटमधील एका छोटय़ाशा चुकीमुळे जगभरात उडालेला हलकल्लोळ आणि त्याचा बसलेला आर्थिक फटका हा माहिती तंत्रज्ञानाच्या नवयुगात वेगाने सफारी करणाऱ्या मानवाला धक्का देणारा ठरला. जगातील महत्त्वाच्या कंपन्या, विविध संस्था आणि सार्वजनिक सेवाक्षेत्र हे मापोसॉफ्टसारख्या विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून आहेत. अशा वेळी एक किरकोळ चूक जनजीवन कोलमडवू शकते याचा विचार कधी कुणी केलाच नव्हता. भविष्यात अशी घटना होणार नाही याचीही खात्री देता येणार नाही. त्यामुळेच येणाऱ्या काळात लिनक्ससारख्या विंडोजला पर्याय ठरणाऱ्या, सुरक्षित आणि मोफत ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करून एकाच कंपनीवरचे अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे.

शुक्रवार, दि. 19 जुलै हा दिवस माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाने व्यापलेल्या आधुनिक जगाला एक जोरदार धक्का देणारा ठरला. विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करणारे जगभरातील लक्षावधी कार्यालयांमधील, आस्थापनांमधील, कंपन्यांमधील संगणक एकाएकी बंद पडले आणि या कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले. विमान वाहतूक, बँका, शेअर बाजार आदी अनेक ठिकाणी त्यामुळे प्रचंड हलकल्लोळ उडाला. मुळात हे कशामुळे घडते आहे याचा थांगपत्ताच सुरुवातीला न लागल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. सध्याच्या इंटरनेट युगामध्ये सायबर हल्लेखोरांची भीती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे हा एखादा सायबर हल्ला आहे का? याविषयीची चर्चा सुरू झाली, परंतु तोवर मापोसॉफ्टकडून याबाबतचा तपशील जाहीर केला गेला आणि एका अपडेटमुळे ही सारी करामत घडल्याचे स्पष्ट झाले.

मायक्रोसॉफ्टची विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम जगभरामध्ये सर्वत्र वापरली जाते. त्या अर्थाने तिला ‘मार्केट लीडर’ असेही म्हणता येईल. ऑपरेटिंग सिस्टीमचे दोन प्रकार असतात. यापैकी एक असते ती सर्व्हरसाठीची ऑपरेटिंग सिस्टीम. यामध्ये सर्व मोठमोठी अॅप्लिकेशन्स चालतात, तसेच इंटरनेटचे सर्व सर्व्हर असतात. अशा ठिकाणी लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते, पण सर्वसामान्य युजर्सकडून विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. जे लोक अॅपल कंपनीचे संगणक वापरतात, त्यांच्या संगणकामध्ये मात्र मॅक ही ऑपरेटिंग सिस्टीम असते. विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमची अंतर्गत कार्यपद्धती किंवा ती आतून कशा प्रकारे चालते याविषयीचे सर्व तपशील केवळ मायक्रोसॉफ्टलाच माहीत असतात. याउलट लिनक्स ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ओळखली जाते. ती कशा प्रकारे चालते याचे सर्व तपशील जगजाहीर आहेत. विंडोजबाबत तसे नाहीये. त्यामुळे हॅकर्स किंवा सायबर हल्ला करणारे ठकसेन हे सातत्याने विंडोजमधील कच्चे दुवे शोधून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीममधील सुधारणांसाठी वारंवार अपडेट करावी लागते. यासाठी मायक्रोसॉफ्टकडून विविध प्रकारचे पॅचेस रिलीज केले जातात, परंतु यासोबतच यातील सुरक्षिततेशी संबंधित अडचणींवर काम करण्याची जबाबदारी मायक्रोसॉफ्टने क्राऊडस्ट्राईक नावाच्या दुसऱ्या एका कंपनीला दिली आहे. या कंपनीचे फॅल्कन नावाचे एक सॉफ्टवेअर असून ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बऱ्यापैकी खोल रुजलेले आहे. त्यामध्ये सुरक्षिततेसंबंधीच्या सुधारणा क्राऊडस्ट्राईककडून केल्या जातात. मायक्रोसॉफ्टशी या कंपनीचा करार झालेला असून कॉर्पोरेट जगतातील संगणकांवरील विंडोजमध्ये सुरक्षिततेसंबंधीचे अपडेटस् देण्याची जबाबदारी क्राऊडस्ट्राईककडे आहे आणि त्यानुसार हे अपडेटस् नियमितपणाने दिले जात असतात. वैयक्तिक संगणकांवर कॉर्पोरेट क्षेत्रातील संगणकांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांसारखे हल्ले होण्याची शक्यता दुर्मिळ असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संगणकांवर फारसे अपडेटस् येत नाहीत आणि आले तरी ते थेट मापोसॉफ्टकडून येतात.

क्राऊडस्ट्राईककडून फॅल्कनमध्ये अपडेटस्चा पॅच तयार करत असताना एक छोटीशी चूक झाली. त्या पॅचमधील सॉफ्टवेअर नीट टेस्ट करण्यात आले नव्हते. तशा स्थितीतच तो पॅच अपलोड केला गेला आणि सर्व

कॉर्पोरेट संगणकांवर डाऊनलोड झाला. या पॅचमध्ये एक अशी सूचना (मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन) दिली गेली होती की, ‘सदर पॅच अॅप्लाय करत असताना विंडोजचे काम सुरूच होऊ नये,’ अशा प्रकारची सूचना रन कर. कोणताही प्रोग्रॅमर अशा प्रकारच्या सूचना लिहू शकतो, पण सर्वसामान्यपणे तशा सूचना विंडोज स्वीकारत नाही. याचे कारण उद्या जर कुणी अशा प्रकारची सूचना लिहिली तर धडाधड सगळे संगणक बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा सूचना ठरावीक परवानगी असेल तरच  कार्यान्वित होतात. क्राऊडस्ट्राईक ही कंपनी मायक्रोसॉफ्टकडेच काम करत असल्याने त्यांच्याकडे याबाबतची परवानगी होतीच. त्यामुळे त्यांच्याकडून ही चुकीची सूचना अपडेट होताच जगभरातील विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या कॉर्पोरेट संगणकांचे कामकाजच बंद पडले.

या अपडेटमुळे उद्भवलेल्या स्थितीला ‘ब्लू पीन ऑफ डेथ’ असे म्हटले गेले. याचे कारण पूर्वी विंडोजमध्ये काही अडचण निर्माण झाली तर तो संगणक क्षणार्धात बंद पडायचा आणि समोर निळ्या रंगाचा पीन दिसू लागत असे. त्यावर लोकांना अगम्य असतील अशा प्रकारचे संदेश त्यावर दिसायचे आणि कामकाज ठप्प व्हायचे. तेव्हापासून त्याला विंडोजमध्ये ‘ब्लू पीन

ऑफ डेथ’ असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी विंडोज 95, 98मध्ये हा प्रकार सातत्याने घडायचा, पण विंडोज एक्सपी  आल्यापासून ही पीन दिसणे बंद झाले होते. कारण मायक्रोसॉफ्टने यासंबंधीच्या त्रुटींमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. तथापि क्राऊडस्ट्राईकच्या एका विचित्र अपडेटमुळे बऱ्याच वर्षांनी हा ‘ब्लू पीन ऑफ डेथ’ संगणकांच्या पडद्यावर झळकला. मायक्रोसॉफ्टकडून शीघ्र गतीने याबाबत सुधारणा करण्यात आल्याने काही तासांनी सर्व संगणक पूर्ववत स्थितीत आले खरे; पण त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोक्यांच्या शक्यतांचे आणि त्या अनुषंगाने असंख्य प्रश्नांचे दार खुले झाले.

येणाऱ्या काळात जर पुन्हा असा प्रकार घडला आणि त्यातील तांत्रिक दुरुस्ती दीर्घकाळ होऊ शकली नाही तर काय? हा प्रश्न सर्वांच्याच मनात डोकावून गेला. यावर प्रथमदर्शनी दिसणारे साधेसोपे उत्तर म्हणजे  ज्यांना शक्य असेल त्यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमऐवजी लिनक्स वापरली पाहिजे. याचे कारण मोफत स्वरूपात उपलब्ध असणारी लिनक्स ही अतिशय भक्कम ऑपरेटिंग सिस्टीम मानली जाते. ती ओपन सोर्स पद्धतीची असल्यामुळे त्यामध्ये नवीन काही दोष शोधत बसणे हल्लेखोरांना अवघड होते. कारण त्यामध्ये असणाऱ्या त्रुटींवर हुशार मंडळी आधीपासूनच पॅचेस तयार करत असतात. त्यामुळे विंडोजपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टीने ती नक्कीच सरस आहे. काहीजणांचा असा आक्षेप आहे की, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम विंडोजपेक्षा वापरण्यास कठीण आहे. यामध्ये काही अंशी तथ्य असले तरी अलीकडील काळात लिनक्स ही मोठ्या प्रमाणावर युजर फ्रेंडली झाली आहे. पूर्वीच्या काळी यातील फीचर्स वापरण्यासाठी सर्व काही टाइप करावे लागत असे. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा कुशल असणाऱयांना ती वापरणे शक्य होत असे, पण सर्वसामान्यांसाठी लिनक्स दुर्बोध ठरत होती. आता मात्र लिनक्सने कात टाकली आहे. त्यामुळे तिचा वापर केला गेल्यास आर्थिकदृष्टय़ाशी फायदेशीर ठरू शकेल आणि विंडोजवरील परावलंबित्वही कमी होऊ शकेल. मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम खरेदी करण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात. तसेच मायक्रोसॉफ्टकडून नवीन किंवा अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम आणली गेली की, जुन्या ओएसचा सपोर्ट काढून घेतला जातो. त्यामुळे संगणकावरील अनेक अॅप्लिकेशन्स वापरणे कठीण होऊन जाते. परिणामी, पुन्हा नवीन ओएस खरेदी करण्याशिवाय गत्यंतर नसते. या सर्व खर्चाचा विचार करता शून्य खर्चात मिळणारी लिनक्स हा नक्कीच एक सार्थ पर्याय ठरू शकतो.

दुसरी गोष्ट म्हणजे कंपन्यांनी विंडोज अपडेट होण्यापूर्वी स्वत:चा बॅकअप घेऊन ठेवणे गरजेचे आहे. अर्थातच ही बाब खूप कठीण आहे. कारण विंडोजकडून कधीही अपडेट येत असतात. दिवसभराचे कामकाज ठप्प पडणार असेल तर अशा प्रकारच्या पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. येणाऱ्या काळात कदाचित कंपन्या याबाबत गांभीर्याने विचार करू शकतात. याखेरीज काही संगणकांसाठी विंडोजचा वापर करणे आणि काही ठिकाणी लिनक्सचा वापर करणे हाही पर्याय अवलंबता येईल.

मायक्रोसॉफ्ट ही जगातील तीन सर्वात मोठ्या क्लाऊड कंपन्यांपैकी एक आहे. क्लाऊड तंत्रज्ञानाच्या व्यवसायात अॅमेझॉन पहिल्या स्थानी असून दुसऱ्या स्थानी मायक्रोसॉफ्ट आहे, तर तिसऱ्या स्थानावर गुगल आहे. अलीकडील काळात बऱ्याच कंपन्यांनी क्लाऊडसाठी एकाच कंपनीवर अवलंबून न राहता या तिन्ही कंपन्यांमध्ये तो विभागण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये जर असा काही बिघाड झाला तरी कामकाज ठप्प होण्याचा धोका राहत नाही.

वैयक्तिक पातळीवरही आता लोकांनीही लिनक्ससारख्या ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीमचा विचार केला पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याकडे वळले पाहिजे. या दोन्हींशिवाय अॅपलचा पर्यायही उपलब्ध आहे; परंतु अॅपलची सर्व डिव्हाइसेस ही तुलनेने महागडी आहेत. त्यामुळे  वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी, कंपन्यांनी  मायक्रोसॉफ्टवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार केला पाहिजे. हाच या प्रकरणाचा धडा म्हणावा लागेल.

(लेखक संगणक तज्ञ आहेत)