पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले

संशयित वाहनचालकाला रस्त्यात थांबवून चौकशी केली म्हणून संतापलेल्या वाहनचालकाने वाहतूक पोलीस आणि एका महिला पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी बुधवार पेठ चौकात घडली. मात्र लायटर न पेटल्याने दोघेही बचावले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या घटनेमुळे पुण्यात पोलीसही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.

संजय फकीरा साळवे (32, रा. पिंपरी -चिंचवड, मूळ जालना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार समीर सावंत (38, रा. स्वारगेट पोलीस वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.

बुधवार पेठ परिसरातील मजूर अड्डा चौकात महिला सहाय्यक निरीक्षक  शैलजा जानकर आणि कर्मचारी समीर सावंत वाहतूक नियमन करत होते. यावेळी मद्यपान केल्याच्या संशयावरून त्यांनी साळवेची दुचाकी थांबविली. त्यानंतर त्याला ब्रेथ अॅनालायझर टेस्ट देण्यास सांगण्यात आले, मात्र त्याने ब्रेथ अॅनालायझर टेस्ट देण्यास नकार दिला. पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने रस्त्यातच वादावादी सुरु केल्याने पोलिसांनी त्याला शेजारील फरासखाना वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथेही त्याने वादावादी सुरू केली. मला पाणी प्यायचे आहे, गुळण्या करायच्या आहेत असे म्हणत तो गाडीतील बाटली आणण्यास सोडा असे सांगू लागला, मात्र त्याला जाऊ न दिल्याने त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. त्याला पाठलाग करून पुन्हा त्याच्या दुचाकीजवळून पकडून आणले. तेव्हा त्याने दुचाकीच्या डिॊकीतील बाटली सोबत आणली होती. कार्यालयात आल्यावर त्याने पुन्हा आरडाओरडा करण्यास सुरवात केली. इतक्यात त्याने अचानक हातातील बाटलीतील पेट्रोत सावंत यांच्या अंगावर टाकले. त्यावेळी महिला अधिकारी जानकर यांनी त्याचा हात पकडला. मात्र त्याने हाताला हिसका मारून महिला अधिकाऱ्याचा अंगावरही पेट्रोल ओतले. काही कळायच्या आत त्याने खिशातील लायटर काढून पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उलटे धरल्याने पेटले नाही. त्यामुळे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बचावले.

नागपूरनंतर आता पुणे गुन्हेगारीचे केंद्र – सुप्रिया सुळे

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून राज्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या परिस्थितीकडे राज्य सरकारचे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते, मात्र आता पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रबींदू बनू लागले आहे, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.