स्ट्राँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न; सुरक्षा गार्डला मारहाण, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ठेवलेल्या चार सुरक्षा रक्षकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल नाळे, अभिजीत भोसले, करण पवार, दिगंबर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी परवानगी दिलेली असताना व स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी गणवेशधारी पोलीस असतानाही स्वतः परवानगी नसतानाही खाकी गणवेश परिधान केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

लोकशाही मार्गाने गुंडगिरीला चाप बसणार

कर्जत -जामखेडमध्ये भाजपच्या सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएमच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पडला. याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याची भूमिका घेतली.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास दादासाहेब पिसाळ, संतोष म्हेत्रे, यश बोरा, योगेश दळवी, राहुल गांगर्डे व शुभम माने यांच्यासह 20 ते 30 जण दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहाच्या मेन गेटसमोर आले. त्यांनी त्या ठिकाणी असणाऱया पोलीस कर्मचाऱयांना गैरकायद्याचे मंडळी जमवून तुम्ही बारामती ऍग्रोचे लोक येथे का बसू दिले, असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ केली होती.