दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध; हिंदुस्थानसोबत ठाम उभे राहणार, जागतिक नेत्यांचे आश्वासन

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत हिंदूंना लक्ष्य केले. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषध केला आहे. तसेच या संकटाच्या काळात आम्ही हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले आहे.

काश्मीरमधून येणाऱ्या बातम्या ऐकून त्यांना दुःख झाले आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका हिंदुस्थानसोबत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि जखमींच्या लवकर चांगले आरोग्य मिळो,यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही या संकटाच्या काळात हिंदुस्थानसोबत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशात पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, हा गुन्हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानसोबत उभे राहण्याची आणि सहकार्य करण्याची वचनबद्धता पुतिन यांनी व्यक्त केली.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्याला दुःख झाले आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले. इटलीच्या संवेदना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. आम्ही हिंदुस्थानातील जनतेसोबत ठामपणे उभे आहोत. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची बातमी भयानक आहे. माझ्या संवेदना पीडितांसोबत आणि भारतातील लोकांसोबत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे मला दुःख झाले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल हिंदुस्थानसोबत आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गेडीऑन सार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसोबत आमच्या संवेदना आहेत. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत नेपाळ हिंदुस्थानसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याच्या वृत्तांची आम्ही पडताळणी करत आहोत आणि शक्य ती सर्व मदत करू. पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून दहशतवादाविरोधातील लढाईत सर्व देश हिंदुस्थानसोबत असल्याचे आश्वासन सर्व देशांच्या नेत्यांनी दिले आहे.