दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरणे महागणार

आपल्या बँकेचे एटीएम सोडून दुसऱया बँकेच्या एटीएमधून पैसे काढणे किंवा विविध व्यवहार करणे आता महागणार आहे. कारण आरबीआयने इंटरचेंज शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ही वाढ 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. आरबीआयने आर्थिक व्यवहारांसाठी 1 रुपये शुल्क वाढवले असून एटीएमसंबंधी पायाभूत सुविधा मर्यादित असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम लहान बँकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा अधिकचा भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांत जेव्हा इंटरचेंज शुल्क वाढवण्यात आले आहे, तेव्हा बँकांनी नेहमीच बदल ग्राहकांवर ढकलले आहेत. या वेळीदेखील हेच धोरण बँकांचे असणार आहे. त्यामुळे बँकांकडून ग्राहकांवरील शुल्क वाढवले जाण्याची शक्यता आहे. जेव्हा एखादा ग्राहक त्यांच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेचे एटीएम वापरतो तेव्हा त्याची बँक दुसऱ्या बँकेला शुल्क देते याला इंटरचेंज शुल्क असे म्हणतात.