एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित इंजिनीअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एटीकेटी-कॅरी ऑन मिळावा यासाठी हा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार असल्याचे प्र–कुलगुरूंनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कालिना संकुलात सुरू असलेले विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन शेवटी मागे घेण्यात आले. युवासेना सदस्य आणि प्र कुलगुरू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित इंजिनीअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे एटीकेटी-कॅरी ऑन मिळावा यासाठी विद्यार्थी आणि पालकांना गुरुवारी दुपारपासून विद्यापीठाच्या कालिना संकुलात आंदोलन पुकारले होते. कॅरी ऑनमुळे त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळू शकणार आहे आणि त्यांचे शैक्षणिक वर्षही फुकट जाणार नाही. याबाबत अनेक विद्यार्थी व पालकांनी युवासेना सिनेट सदस्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य-शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर-शेठ, मिलिंद साटम, सिनेट सदस्य स्नेहा गवळी यांनी त्वरित विद्यापीठ प्र–कुलगुरू भामरे यांच्याशी चर्चा करून या विषयाचे गांभीर्य त्यांना सांगितले. विद्यापीठ प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर हा विषय तातडीने विद्यापीठाच्या अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर जमलेल्या सर्व विद्यार्थी-पालकांशी संवाद साधून त्यांना दिलासा मिळताच रात्री 10 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना देणार निवेदन

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत लवकरच या विषयावर युवासेनेच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत निवेदन देणार आहे, असे आश्वासन शिवसेना- युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांनी दिले आहे.