New CM Of Delhi Atishi: आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री , आप आमदारांच्या बैठकीत निर्णय

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला आमदारांनी सहमती दर्शवली. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला मंगळवारी नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.

कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयकडून त्यांची चौकशी झाली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयात भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती.

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता सर्वांना होती. यामध्ये सहा जणांची नावे शर्यतीत होती. यात आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, कुलदीप कुमार, राखी बिर्ला यांची नावे आघाडीवर होती. यात आतिशी यांनी बाजी मारली मारली.