अभिव्यक्ती – नग्नता आणि अश्लीलता

>> डॉ. मुकुंद कुळे

श्लील-अश्लीलतेचा वाद नवीन नाही. कलेपासून साहित्यापर्यंत सर्वत्र तो झडलाय. नग्नता आणि अश्लीलता या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आमच्या समाजाला कधी उमगणार?
कारण नग्नता हाच मुद्दा असेल तर नागा साधूंची-मुनींची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. विशेष म्हणजे हे नागा साधू कायमच कुंभमेळ्याचं एक मोठं आकर्षण राहिलेलं आहे. सामाजिक जीवनात नग्नपणे वावरणाऱयांवर आपण अश्लीलतेचा आरोप करतो का? मग त्या नागा साधूंमुळे जर कुणाच्या भावना दुखावत नसतील तर चित्र-छायाचित्रांतील कलात्मक नग्नतेमुळे कुणाच्या भावना का दुखवल्या जाव्यात?

काही वर्षांपूर्वी एक आसामी नाटक पाहिलं होतं – ‘नुपी!’ ‘नुपी’ म्हणजे स्त्राr. या नाटकात सीतेपासून आसामच्या चहाच्या मळ्यात काम करणाऱया स्त्राrपर्यंत पुरुषी अत्याचाराच्या बळी महिला कशा ठरत आल्या आहेत, ते मंचित करण्यात आलं होतं. या नाटकाच्या शेवटी या पुरुषी अत्याचाराचा निषेध एक स्त्राr आपले कपडे उतरवून, नग्न होऊन करते असं दाखवण्यात आलं होतं… विद्रोहाचं ते नग्न दृश्य समोर साकार झालं आणि समोरचे प्रेक्षक केवळ निःशब्द झाले. काही वेळाने पडदा पडला तरी त्याला टाळ्या वाजवायचं भान राहिलं नाही. कारण त्याच्या डोळ्यांसमोरून ती नग्न स्त्राr हटायलाच तयार नव्हती. त्याचं कारण त्यांच्या डोळ्यांत किंवा मनांत वासना उतरलेली नव्हती, तर त्या स्त्राrच्या नग्न होण्यामागील अपरिहार्यता, प्रतीकात्मकता आणि कलात्मकताही प्रेक्षक वर्गाला जाणवलेली होती! कलेतली नग्नता अशी सूचक असते हे ज्यांना कळतं ते त्या कलेचा निर्मळ आस्वाद घेतात आणि ज्यांना कळत नाही, ते त्यातली नग्नता शोधून त्या कलाकृतीची मोडतोड करतात, कलावंताला मारहाण करतात. क्वचित कधी त्या कलावंताला आपला देश, आपली माती सोडून जायला भाग पाडतात. खरोखर हिंदुस्थानी समाजा इतका दांभिक समाज जगाच्या पाठीवर दुसरा नसेल. एकीकडे आपल्या पुराणात नग्नतेसंदर्भातील सगळ्या मर्यादा मोकळेपणाने उल्लंघलेल्या दिसतात आणि त्याच वेळी त्या पुराणांचे गोडवे गाणारी मंडळी मात्र नग्नतेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामागील कलात्मकतेचा कुठलाही संदर्भ लक्षात न घेता. एवढंच कशाला, खासगीत लैंगिकतेविषयी बोलताना त्यांना कसलाही धरबंध नसतो, पण कलेच्या पातळीवर लैंगिकतेला दृश्यरूप दिलं की, यांच्या भावना भडकतात.

… हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेला एक आदेश. त्या आदेशान्वये प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा आणि अकबर पदमसी यांच्या गेल्या वर्षी जप्त केलेल्या चित्रकृती नष्ट करण्यापासून सीमा शुल्क विभागाला रोखण्यात आलं आहे. गंमत म्हणजे या चित्रकृती सीमा शुल्क विभागाने जप्त का केल्या होत्या तसंच त्या नष्ट का केल्या जाणार होत्या, तर सुझा आणि पदमसी यांची चित्रं सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱयांना अश्लील वाटली होती म्हणे! कारण त्यांच्या लेखी जे जे नागडं ते अश्लील. आता सामाजिक जीवनातील नग्नता आणि कलेतील नग्नता यात भेद असतो हे यांना कोण सांगणार?

सुझा-पदमसी यांनी पूर्वीच काढलेल्या नग्न चित्रकृती सीमा शुल्क विभागाने आता अश्लील ठरवल्या, तर दोनेक वर्षांपूर्वी समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेली रणवीर सिंगची नग्न छायाचित्रं काही सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी अश्लील ठरवली होती. तसं बघायला गेलं तर श्लील-अश्लीलतेचा वाद नवीन नाही. कलेपासून साहित्यापर्यंत सर्वत्र तो झडलाय. मुद्दा हा आहे की, नग्नता आणि अश्लीलता या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आमच्या समाजाला कधी उमगणार? कारण नग्नता हाच मुद्दा असेल तर नागा साधूंची-मुनींची आपल्याकडे मोठी परंपरा आहे की! विशेष म्हणजे हे नागा साधू कायमच कुंभमेळ्याचं एक मोठं आकर्षण राहिलेलं आहे. सामाजिक जीवनात नग्नपणे वावरणाऱया त्यांच्यावर आपण अश्लीलतेचा आरोप करतो का? मग त्या नागा साधूंमुळे जर कुणाच्या भावना दुखावत नसतील तर चित्र-छायाचित्रांतील कलात्मक नग्नतेमुळे कुणाच्या भावना का दुखवल्या जाव्यात?

कलात्मक नग्नतेमुळे ज्यांच्या भावना दुखावतात, त्यांना खरं तर आपल्या प्राचीन मंदिरांवरची यक्ष-यक्षिणी, विविध देव-देवांगनांची उत्तान, तरी आखीव-रेखीव शिल्पं दाखवायला हवी किंवा त्याने ती पाहायला हवी. कधी अनावृत, तर कधी अर्धअनावृत अवस्थेतील ही शिल्पं स्त्राr-पुरुष देहांची कमनीयता तर दाखवतातच, पण त्याशिवाय बघणाऱयाच्या मनात तो-तो रसभावही निर्माण करतात. वास्तविक आपल्या प्राचीन मंदिरांवरील कामशिल्पांची उज्ज्वल परंपरा पाहता हिंदुस्थानी मन एव्हाना वैषयिक आणि कलात्मकदृष्टय़ाही सुदृढ-निरोगी व्हायला हवं होतं, परंतु हिंदुस्थानी समाज कायमच प्रत्येक बाबतीत द्विधावस्थेत असलेला दिसतो. म्हणजे एकीकडे त्याला मोकळेपणा हवाही असतो आणि दुसरीकडे त्याला स्वतला बांधून घ्यायलाही आवडतं. हा कदाचित त्या-त्या वेळच्या संस्कृती रक्षकांनी माजवलेल्या नीतिमत्ता-नैतिकतेच्या अवडंबराचा परिणाम असावा. किंवा ब्रिटिश आमदनीत हिंदुस्थानी कला परंपरा नासवल्या गेल्याचाही हा परिणाम असू शकतो. जोपर्यंत हिंदुस्थानी कला परंपरा, संस्कृती आपण दूषित करत नाही, तोपर्यंत हिंदुस्थानींवर आपण प्रभाव पाडू शकत नाही, हे ब्रिटिशांना पूर्णपणे उमगलं होतं. परिणामी हिंदुस्थानींना इंग्रजी शिक्षण देताना त्यांनी आपली कला मूल्यं, जीवन मूल्यं आणि एकूणच जगण्यातील साधनशुचिता नवशिक्षित हिंदुस्थानी तरुणांच्या मनावर बिंबवली. त्यातून हिंदुस्थानी कला परंपरांकडे तुच्छपणे पाहण्याचा नवशिक्षितांचा दृष्टिकोन तयार झाला. परिणामी पारंपरिक कला आणि कलावंतांना नावं ठेवण्याची एकच लाट देशात उसळली आणि त्यातून कलांच्या बाबतीत कधीकाळी मोकळाढाकळा असलेला हिंदुस्थानी समाज संकुचित होत गेला. परंतु त्यामुळे हिंदुस्थानी समाज एक प्रकारे ढोंगी झाला. आतून एक आणि बाहेरून एक असा तो दुटप्पी वागू लागला. बहुधा यामुळेच हिंदुस्थानी कला आणि कलाकारांना म्हणावी तशी जागतिक मान्यता मिळालेली नाही. हिंदुस्थानी संगीत-नृत्य आज जगभरात नावाजलं जात असलं तरी त्यामागे पाश्चात्त्य जगात या कलांबद्दल मोठ्या प्रमाणावर असलेली अनभिज्ञताच कारणीभूत आहे असं वाटतं. म्हणजे अमूर्त पातळीवरचं केवळ स्वराकारयुक्त गाणं आणि विविध हस्तमुद्रा व पदन्यासांत बांधलेलं नृत्य समजण्यासाठी, उमजण्यासाठी किंवा अगदी आस्वाद घेण्यासाठी जी हिंदुस्थानी सांस्कृतिक मानसिकता हवी (ती आपल्याकडेही सहसा नसतेच) ती पाश्चात्त्यांकडे किती असते, याविषयी शंका आहे. याउलट ज्या कलांबद्दल पाश्चात्त्य समाज कायमच जागरूक व अग्रेसर होता. त्या चित्र-शिल्प वा इतर दृश्यकलांमध्ये हिंदुस्थानला अद्याप म्हणावी तशी जगमान्यता मिळालेली नाही. ज्या सहजतेने मायकल एंजेलोसारख्या अनेक नामवंत शिल्प-चित्रकारांनी कलात्मक नग्न शिल्प-चित्रं तिकडे साकारली, तशी आपल्याकडे हिंदुस्थानात फारशी साकारली गेली नाहीत. उलट राजा रविवर्मासारख्यांनी जेव्हा अर्धअनावृत नायिका आपल्या चित्रांत साकारल्या तेव्हा त्यांनाही टीकेचे धनी व्हावं लागलं. म्हणजे हिंदुस्थानी समाजात नग्नतेकडे कायमच दूषित नजरेने पाहिलं गेल्यामुळे तिचा एक शुद्ध कलारूप म्हणून हिंदुस्थानी चित्र-शिल्पकलेत समावेश झाला नाही. परिणामी जागतिक मान्यताही मिळाली नाही.

यात महत्त्वाची गोम हीच आहे की, ज्यात नग्नता आहे ते सारं आपल्या परंपरावाद्यांना अश्लीलच वाटतं. त्यामुळेच नग्नता दिसली की, त्यावर अश्लीलतेचा ठपका मारून ते मोकळे होतात. कुठलंच वस्तुरूप हे कधीही अश्लील असत नाही. आशय किंवा अभिव्यक्ती ही श्लील वा अश्लील असू शकते. मात्र तेही सादरकर्त्यावर, त्याच्या हेतूवर अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या सिनेमात गरज नसताना दिग्दर्शकाने जर उगाच प्रेक्षकांना चाळवण्यासाठी लैंगिक दृश्य टाकलं तर ते अश्लील ठरू शकतं. मात्र लावणी परंपरेत यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकरसारख्या कित्येक ख्यातनाम कलावंतांच्या लावणीतला आशय अश्लील असला तरी त्यावरची त्यांची अदाकारी-अभिव्यक्ती ही कायम कलात्मक असायची. अगदी मासिक पाळी आलेल्या दिवसांचं वर्णन करणाऱया लावण्याही आहेत. परंतु तो आशय आपल्या अदेतून-भावकामातून व्यक्त करताना आमच्या लावणी कलावंत कधीही भरकटल्या नाहीत. उलट आपल्या कलेचा परमोत्कर्ष साधून त्यांनी लावणीतला आशय अधिक आबदार केला. त्यामुळेच तर अशावेळी आशयाऐवजी या कलावंतांच्या सादरीकरणाला, अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळायची.

श्लील-अश्लीलतेची सीमारेषा कायमच अगदी पुसट असते. तसंच एखादी कलाकृती श्लील वा अश्लील होऊ द्यायची किंवा नाही, याच्या नाडय़ा पूर्णपणे कलावंताच्या हातात असतात. किंबहुना त्यामागे त्या कलावंताचा हेतूच महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा आणि अकबर पदमसी यांची जी चित्रं सीमा शुल्क विभागाने जप्त केली होती ती पाहिली तर त्यांना कुणी नग्न किंवा अश्लील म्हणेल काय? ती तर या चित्रकारांची केवळ कलात्मक अभिव्यक्ती आहे!

[email protected]