अटलजी नेहरूंना ‘महानायक’ म्हणायचे, आता ‘खलनायक’ ठरवलं जातंय ही शोकांतिका!

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे अजातशत्रू असं व्यक्तिमत्त्व होतं, त्यांची राजकीय विचारसरणी ही आदर्शवत होती. सर्वधर्मसमभाव आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांविषयी आदर होता. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पं. नेहरू यांना महानायक म्हणायचे; पण आजची भाजप नेहरू यांना खलनायक म्हणतात, ही खूप मोठी शोकांतिका आहे, अशी टीका पंतप्रधान कार्यालयातील माजी अधिकारी सुधिंद्र कुलकर्णी यांनी केली.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘माय इयर्स विथ अटलबिहारी वाजपेयी : रिलेव्हन्स ऑफ हिज लेगसी फॉर टूडेज इंडिया’ या विषयावर सुधिंद्र कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, जय जवान, जय किसान याला आणि जय विज्ञान याची जोड अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली. माझ्या सरकारी नोकरीच्या काळात अटलजी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याशी खूप जवळून संबंध आला. भारताला मोठी दिशा देणारा पंतप्रधान अटलजींच्या रूपाने मिळाला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप गोष्टी विकसित केल्या.

अखंड दक्षिण आशियाचे स्वप्न पूर्ण करूया

1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. आता 2047 साली भारत स्वतंत्रतेची 100 वी साजरी करेल, तेव्हा भारताने दक्षिण आशियामधील सर्व देश एकत्र कसे येतील, यादृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. कारण अखंड भारत असा कधीच होणार नाही. दक्षिण आशियायी देशांना एकत्र आणण्यासाठी नेतृत्व करून, अखंड दक्षिण आशिया याचे स्वप्न बाळगून तसे प्रयत्न केले पाहिजेत, असेही सुधिंद्र कुलकर्णी यांनी म्हटले. अटलबिहारी यांच्यापेक्षा खूप वेगळी कार्यपद्धती मोदी यांची आहे. प्रत्येक नेत्यांना आदर देणारे असे अटलजी होते.

आज नेहरूंविषयी काय काय म्हटलं जात आहे, याचा प्रत्येकला त्रास होतोय. मतभेद असले तरी, नेहरूंविषयी अटलजी हे आदराशिवाय आमच्या हृदयात काही नाही म्हणाले होते. आजचे बीजेपी लीडर नेहरू यांना खलनायक म्हणतात, ही राजनीती म्हणायची का? असा सवाल करून ते म्हणाले, नीती शब्दात किती मोठा अर्थ सामावलेला आहे. आज मात्र राजअनिती दिसते आहे. काही लोकांना वाटत आहे की, भारत काँग्रेसमुक्त होईल; पण कदापिही शक्य नाही. काँग्रेस, बीजेपीमुक्त असा देश कधीच होऊ शकत नाही. वाजपेयी यांना तोडाफोडीचं राजकारण कधीच आवडलं नाही, ते म्हणायचे ‘तोड फोड से सत्ता मिलती है! मै उसे चिमटे से भी छू नहीं सकता !’ आज ही आदर्शपद्धती दिसत नाही. अभय वैद्य यांनी प्रास्ताविक केले.