
आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी प्रशासकीय पातळीवर या निवडणुकीची रणधुमाळी मात्र सुरू झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कोकण विभागात विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी करण्यात आली याचा आढावा निवडणूक आयोगाच्या वतीने उद्या दुपारी घेण्यात येणार आहे. हा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणुकीचे काम करणारे सर्वच अधिकारी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची कोणतीही औपचारिक घोषणा अद्याप निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली नाही. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कोणतीही घोषणा केली नसली तरी निवडणुकीची तयारी मात्र जोरदार सुरू केली आहे. मतदारांची नोंदणी युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक विभागाला निवडणुकीची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. ही कामे कुठपर्यंत मार्गी लागली आहेत याचा आढावा उद्या होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.
प्रशिक्षणाची माहिती
कोकण विभागाची बैठक उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये मतदान कर्मचारीवर्गाची निश्चिती, कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा, सेक्टर ऑफिसर, सेक्टर पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्राची तपासणी, मतदान केंद्राचा प्रस्ताव, मतदान साहित्याचा आढावा, मतदार याद्यांचा आढावा, नोडल ऑफिसर यांची नियुक्ती, निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात येणार आहे.