कृषी विभागाच्या प्रसिद्धीवर साडेचौदा कोटींची उधळपट्टी

विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या प्रसिद्धीवर 270 कोटी उधळल्यानंतर 14 कोटी 69 लाख 87 हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्याच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून कृषी खात्याच्या वतीने जाहिरातबाजी सुरू केली जाणार आहे.

महिला आणि शेतकऱ्याच्या  नाराजीचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत पडला होता. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत ही योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या योजनेच्या प्रसिद्धीवर 270 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्याच्या नाराजीचा फटका महायुती सरकारला बसला होता. मध्यंतरी खरीप हंगामाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर पह्डले होते. शेतकऱ्यासाठी आम्ही योजना करतो, पण तुम्ही त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यावर पोहोचवण्यासाठी कृषी विभागाच्या प्रसिद्धीवर साडेचौदा कोटी रुपये खर्च करणार आहे.

डिजिटल मीडियावर उधळण

सोशल मीडियावरील जाहिरातींसाठी अडीच कोटी, डिजिटल मीडियावर एक कोटी रुपये, मराठी भाषेतील बल्क एसएमएससाठी अडीच कोटी रुपये, खासगी होर्डिंगवर दोन कोटी रुपये, पोस्टर- बॅनरच्या छपाईवर एक कोटी 40 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.