महाराष्ट्र की अदानीराष्ट्र… आज मतदान

‘महाराष्ट्र हवे की अदानीराष्ट्र’ यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राचे ‘अदानीकरण’ रोखण्याची हीच संधी आहे. मराठी अस्मिता, मुलाबाळांचे कल्याण, महिलांची सुरक्षा आणि तरुणांच्या हाताला काम यासाठी महाराष्ट्र आज आपला कौल देणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 288 मतदारसंघांत 4134 उमेदवार रिंगणात असून 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना असून राज्यातील भ्रष्ट आणि घटनाबाहय़ मिंधे-भाजप सरकारचा फैसला शनिवार 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

महाराष्ट्रात घटनाबाह्य पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-भाजप महायुती सरकारने राज्य अक्षरशः खड्डय़ात घातले आहे. राज्यात महिलांसह चिमुकल्या मुलीही सुरक्षित नसून राज्यात दररोज पाच ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा कहर झाला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार केल्याने मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळा उभारणीनंतर वर्षभरातच कोसळला. त्यामुळे जनमत मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा केल्याने राज्यावरील कर्जाचा बोजा 7 लाख 82 हजार कोटींवर गेला असून प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 62 हजार 941 रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम देणारे तब्बल पाच लाख रोजगार गुजरातला पळवले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान केले. भूमिपुत्र धारावीकरांसह मुंबईकरांना बेघर करून मुंबईतील तब्बल एक हजार एकर जमीन अदानीच्या घशात घालण्याचे काम केले. त्यामुळे आता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱया मतदानाच्या निमित्ताने जनतेला ‘महाराष्ट्र हवा की अदानीराष्ट्र’, याचा फैसला करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राचे अदानीकरण रोखण्यासाठी, मुलाबाळांचे कल्याण, महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र मतदान करणार आहे.

घटनाबाह्य सरकारचा ‘फैसला’ होणार

या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ही लढाई होत आहे. मुंबईत एकूण 36 जागांसाठी हे मतदान होणार आहे. राज्यात अडीच वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या घटनाबाह्य सरकारचा ‘फैसला’च या निवडणुकीत होणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपल्या अधिकृत ओळखपत्रासह मतदान करता येणार आहे. राज्यभरात 1523 मतदान पेंद्रांवर मतदान होणार आहे.