Assembly election 2024 – ‘पोर्शे’ची ‘धडक’ वडगाव शेरीत बसणार!

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे आणि महायुतीचे सुनील टिंगरे यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात मराठा, दलित, मुस्लिम मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या मतदारसंघात प्रत्येक वेळी नवीन आमदार निवडून आला आहे. यावेळी ही परंपरा कायम राहणार का? हे निकालाअंती समोर येणार असले, तरी पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे सध्या या मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. ऐन निवडणुकीतही पोर्शे कार अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आणि टिंगरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांना दिलेल्या नोटिसांवरून वडगाव शेरी मतदारसंघात मोठा गदारोळ सुरू आहे. त्यामुळे ‘पोर्शे’ची ‘धडक’ वडगाव शेरीत भोवणार का? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.

वडगाव शेरीच्या निवडणूक आखाड्यात प्रमुख उमेदवारांसह एकूण १६ उमेदवार आहेत. यांत महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे आणि महायुतीचे सुनील टिंगरे यांच्यात थेट लढत होणार आहे.

हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाने व्यापलेला आहे. शहरी व ग्रामीण भागांचा या मतदारसंघात समावेश आहे. एका कोणत्या भागावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून नाही.

2014 च्या निवडणुकीत भाजपच्या जगदीश मुळीक यांनी तत्कालीन शिवसेनेचे सुनील टिंगरे यांचा पाच हजार 325 मताधिक्याने पराभव केला. सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा चार हजार 956 एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता. मागील दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात विजयाचे मताधिक्य विचारात घेता, फार मोठा फरक नसल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपकडून इच्छुक असलेल्या जगदीश मुळीक यांची समजूत काढण्यात यश आले असले, तरी त्यांनी केलेली तयारी पाहता, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडगाव शेरी मतदारसंघात पूर्वी निवडून आले आहेत. पठारेंनी नगरसेवक व महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. अनुभवी राजकारणी व ग्राऊंड वर्कची जाण असलेला नेता म्हणून पठारेंची ओळख आहे.

नोटिशीत अडकले टिंगरे

मे महिन्यात कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार अपघातातील आरोपींशी येथील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचे काही ‘कनेक्शन’ आहे का? अशा अनेक गप्पा राजकीय वर्तुळासह देशपातळीवर माध्यमांतून पोहोचल्या. आता ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पोर्शे कार अपघात प्रकरणावरून आरोप सुरू आहेत. त्यातच आमदार सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष आणि नेत्यांना नोटिसा पाठविल्याचे समोर आले आहे. यामुळे वडगाव शेरीमध्ये ‘पोर्शे’ची ‘धडक’ कोणासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरणार, हे निकालावरून दिसून येईल.