रुग्णवाहिका आणि कॅशव्हॅनवरही निवडणूक आयोगाचा वॉच, पैशाची वाहतूक करण्यासाठी रोज नव्या क्लृप्त्या

मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणतीही प्रलोभने देऊ नका. शासकीय वाहनांमधून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक होणार नाही यावर कडक लक्ष ठेवा. रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी शासकीय वाहनांचा तसेच रुग्णवाहिका किंवा एटीएमच्या व्हॅन यांचा वापर होणार नाही याचीही खात्री करावी, असे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

विधानसभा निवडणुकीत शहरी भागात मतदानातील मतदारांचा  सहभाग वाढविण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले. लोकसभा निवडणुकीत बस्तरमध्ये 68 टक्के, गडचिरोलीत 78 टक्के मतदान झाले. यासारख्या नक्षलप्रभावित भागातील मतदार मतदान करू शकतात, तर कुलाबा आणि कल्याणमधील मतदार मतदान का करू शकत नाहीत, असा सवाल राजीव कुमार यांनी केला. 2019 च्या निवडणुकीत कुलाबा मतदारसंघात  फक्त 40 टक्के मतदान नोंदवले गेले होते याकडे लक्ष वेधले.  या बैठकीला सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

निवडणुकीच्या दरम्यान तक्रार निवारणासाठी, सर्वांसाठी समानपणे उपलब्ध राहा. आपल्या नेमून दिलेल्या कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. याशिवाय अधिकाऱ्यांनी  सर्व पक्ष आणि उमेदवारांसाठी समान संधी प्रदान करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राजीव कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिला.

मतदान केंद्रात खुर्च्या  

सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय  अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक किमान सुविधा पुरवाव्यात. मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी मतदान  केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बेंच, खुर्चीची व्यवस्था करावी असे आदेशही त्यांनी दिले.