विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मालमत्ता लपवली, हायकोर्टात आमदारकीला आव्हान; उद्या सुनावणी

नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे पुण्यातील मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी अण्णा बनसोडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठासमोर बुधवारी 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेल्या वर्षी निवडून आले. निवडणूक लढवण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे त्यांनी संपत्ती तसेच मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर केली; मात्र हवेली तालुक्याच्या चिखली येथील गट क्रमांक 1593 हा 1.34 कोटींचा भूखंड, गट क्रमांक 1596 हा 91 लाख रुपये किमतीचा भूखंड तसेच वन सिद्धार्थ मागासवर्गीय गृहसंस्थेची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुलक्षणा धर यांनी हायकोर्टात अ‍ॅड. स्नेहा भांगे व अ‍ॅड. स्वप्नील सांगळे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे.

याचिकेत काय म्हटले आहे…

  • आमदार बनसोडे यांनी मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगापासून जाणीवपूर्वक दडपली.
  • प्रलंबित गुन्हेगारी खटले आणि मालमत्ता जाणूनबुजून उघड न करणे व अयोग्य माहिती सादर करुन आमदार बनसोडे यांनी मतदारांवर चुकीचा प्रभाव पाडला.
  • आमदार बनसोडे यांनी भ्रष्ट पद्धतीने निवडणूक जिंकली असून कायद्याच्या कलम 100(1)(ब) अंतर्गत त्यांची निवड रद्द करण्यात यावी.
  • निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेचे पालन न केल्याने निवडणूक निकाल रद्दबातल करण्यात यावा व नव्याने निवडणूक घ्यावी.