हिंदूंवरील अत्याचाराचे हिंदुस्थानात पडसाद! आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांना हॉटेल बंदी

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने हिंदूवर होत असलेले हल्ले, अत्याचार, जाळपोळ याचे पडसाद हिंदुस्थानात उमटत आहेत. आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल मालकांनी जोपर्यंत बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेशी नागरिकांना हॉटेलमध्ये सेवा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. कछार, श्रीभूमी आणि हायलाकांडी या जिह्यांमध्ये बांगलादेशच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. देशातील विविध ठिकाणी आंदोलनाद्वारे बांगलादेशचा निषेध केला जात आहे.

‘बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार जोवर थांबत नाही तोवर आम्ही शेजारील देशातील कोणत्याही नागरिकांना बराक खोऱयातील तीन जिह्यांमध्ये थारा देणार नाही. निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. देशात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी बांगलादेशच्या नागरिकांना प्रयत्न करावे लागतील. असे झाले तरच आम्ही आमच्या निर्णयाचा पुनर्विचार करू,’ असे रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय यांनी सांगितले.

आणखी एका इस्कॉन मंदिरावर हल्ला

बांगलादेशात इस्कॉन मंदिराची तोडपह्ड केल्याने हिंदुस्थान आणि बांगलादेशमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले. शनिवारी कट्टरवाद्यांनी इस्कॉनच्या आणखी एका मंदिराला लक्ष्य केले. नमहट्टा मंदिराची तोडफोड केल्यानंतर मूर्तींना आग लावण्यात आली. कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची पुष्टी केली. पेट्रोलच्या सहाय्याने मूर्तीला आग लावली असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच मुस्लिम जमावाने नमहट्टा केंद्र जबरदस्तीने बंद केले होते. चिन्मय कृष्ण दास आणि त्यांच्या सहकाऱयांच्या अटकेनंतर मंदिरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.