कामात व्यस्त असल्याने अनेकदा आई-वडील किंवा सासू-सासरे यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु आसाम सरकारकडून आता सरकारी कर्मचाऱयांना दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. या दोन दिवसांच्या सुट्टीत कर्मचारी आपल्या आई-वडिलांना किंवा सासू-सासऱयांना भेटू शकतील. कौटुंबिक संबंध आणखी दृढ करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. कुटुंबात जास्तीत जास्त वेळ घालता यावा, यासाठी आसाम सरकारने ही योजना सरकारी कर्मचाऱयांसाठी आणली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून गुरुवारी यासंबंधीची माहिती दिली. सरकारी कर्मचाऱयांनी घेतलेली दोन दिवसांची सुट्टी ही कौटुंबिक कारणासाठी वापरावी. या सुट्टीचा उपयोग मनोरंजन करण्यासाठी करू नये, असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 6 आणि 8 नोव्हेंबर 2024 ला राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी विशेष दोन दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली. 7 नोव्हेंबरला छठ पूजा, 9 नोव्हेंबरला दुसऱया शनिवारची सुट्टी, 10 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे. या सुट्टीसोबत सरकारी कर्मचाऱयांना दोन दिवसांची सुट्टी घेता येईल.