मंत्र्यांच्या सग्यासोयऱ्यांचा डांबर घोटाळा; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप

राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या वरदहस्तामुळे डांबराच्या बिलातून सरकारकडून शेकडो कोटी रुपये उकळल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला. सरकारमधील लोकांनी डांबरात भ्रष्टाचार करून सरकारचेच तोंड काळे केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. जयंत पाटील यांनी सभागृहात कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नाही. मात्र सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे थेट नाव घेतले.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे पंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्याचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले. या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजने अंतर्गत पोहच रस्ता ते जॅकवेलपर्यंत जाणाऱया डांबरी रस्त्याचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच असल्याचे सांगत बिलाचा नंबर सादर केला. या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे. दुसरे उदाहरण म्हणजे नेवरे भांडारपुळे रस्ता या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपिंग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक बीपीसीएस 4582165219 हा आणि एमआयडीसी अंतर्गत रत्नागिरी पाणीपुरवठा योजने अंतर्गत हार्चेरी जॅकवेलपर्यंत जाणारा पोहच रस्ता पुनर्डांबरीकरणाचे केलेल्या कामाच्या डांबराच्या बिलाचा नंबरदेखील सारखाच आहे. म्हणजेच या दोन्ही कामासाठीदेखील एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

या कंपनीने अशा प्रकारचे शेकडो कोटीचे अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील असून तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत या कंपनीने केलेल्या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.