अभिप्राय – पत्रलेखनाच्या गतस्मृतींना उजाळा

>> अस्मिता येंडे

संवाद साधणे ही जीवनातील महत्त्वाची क्रिया आहे. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, आपल्या अंतरंगात काय सुरू आहे हे समोरच्या व्यक्तीला समजण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे आहे. रोजचे दैनंदिन व्यवहार, वैचारिक उलाही बोलण्यातून होते. त्यात भाषा हे अत्यंत मौलिक माध्यम असते. आताचे तंत्रज्ञान खूप प्रगत आहे, त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱयात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणे सहजशक्य झाले आहे. अगदी एका क्षणात विविध समाजमाध्यमांच्या आधारे समोरील व्यक्ती प्रतिक्रिया देते तसेच संदेशही पोहोचवते. पण या तत्काळ प्रतिक्रिया मिळण्याच्या सोयीमुळे माणसाला धीर धरणे, संयम राखणे याची सवय उरली नाही. जेव्हा संपर्क साधण्याचे माध्यम फक्त पत्र होती तेव्हा त्या प्रत्येक पत्राचे महत्त्व, मोल तसेच पत्राच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहणारे मन, त्यामागील भावना, त्याची जाणीव वेगळी होती.

चला तर, पुन्हा एकदा त्या हरवलेल्या पत्रांच्या जगात जाऊ या! लेखक सुनील पांडे हे साहित्य क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. नावीन्यपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्टय़! पुन्हा एकदा पत्रांच्या गतस्मृतीमध्ये रमण्यासाठी तसेच आताचा पत्रलेखन हा विषय जो फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी परिचित आहे, तेच पत्रलेखन सामाजिक जनजीवनातील महत्त्वाचे अंग होते, हे सांगण्यासाठी लेखक सुनील पांडे यांनी ‘प्रिय सोनिया’ ही कादंबरी लिहिली. ‘प्रिय सोनिया’ ही पत्रात्मक कादंबरी असून पत्रातून साधलेल्या संवादातून कादंबरीचा विषय वाचकांसमोर उलगडत जातो. साधी सोपी शब्दशैली, सुटसुटीत रचना, कादंबरी असूनही आकृतिबंधाचे भान राखून पत्रातून नेमकेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. कादंबरीच्या शीर्षकात आपलेपणा आहे कारण पत्राची सुरुवात प्रिय शब्दाने केली जाते. या छोटय़ाशा शब्दातून आपलेपणाची भावना, आदर व्यक्त होतो.

या पत्रात्मक कादंबरीत जी पत्रे दिलेली आहेत, ती पत्रे म्हणजे सोनिया आणि सलील यांच्यातील सुसंवाद आहे. 19 ऑगस्ट 2002 पासून सुरू झालेला हा पत्रसंवाद 28 जानेवारी 2004 मध्ये समाप्त होतो. या दरम्यान या पत्रांच्या माध्यमातून नेमके काय घडत जाते हे या कादंबरीतून दर्शवलेले आहे. माणसाच्या कल्पनाशक्तीच्या आधारावर कोणतेही काल्पनिक जग उभे करता येऊ शकते. त्यासाठी सूक्ष्म आकलनशक्ती, सर्जनशीलता हवी हे लेखकाच्या लेखनशैलीतून दिसून येते. अत्यंत आनंद, उत्साह, आतुरता, विवशता, समाधानाचे क्षण अशा भावनांचे वळण कादंबरीत दिसून येते.

सोनिया ही एक अभिनेत्री आहे, जी मुंबईत राहते. तिला अभिनयाची तसेच वाचनाची आवड आहे. पुण्यात राहणारा तरुण सलील कुलकर्णी हा सोनियाच्या अभिनयाचा चाहता आहे. आपल्याला जी अभिनेत्री आवडते, तिला भेटता नाही आले तरी तिच्याशी संपर्क साधता आला तर किती आनंदाची गोष्ट असेल! प्रेक्षक म्हणून त्यांचे काम आवडते, हे सांगण्यासाठी सलील सोनिया या अभिनेत्रीला पत्र लिहितो आणि सोनिया त्या पत्राला उत्तर देते. इथूनच त्यांच्यातील पत्रसंवादाला सुरुवात होते. हस्ताक्षरातून परिवर्तित झालेले मनातील भाव पत्ररूपात वाचताना आपलेपणाची अनुभूती येते. तीच प्रचिती देणाऱया या पत्रात्मक कादंबरीचे मुखपृष्ठ श्री. संतोष धोंगडे यांनी साकारले आहे तसेच डॉ. स्नेहल तावरे यांनी कादंबरीची पाठराखण केली आहे.