Asian Champions Trophy 2024 – चक दे इंडिया…; हिंदुस्थानचा विजयी पंजा, चीनचा केला पराभव

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात उतरलेल्या हिंदुस्थानने फायनलमध्ये चीनचा 1-0  पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयासोबत टीम इंडियाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या किताबावर आपले नाव कोरले.

चीनच्या हुलुनबुर येथे पार पडलेल्या फायनलमध्ये चीनच्या संघाने टीम इंडियाला कडवी झूंज दिली. त्यामुळे पहिल्या तीन क्वार्टरमध्यो कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराज सिंगने चीनच्या खेळाडूंचा प्रतिकार जुगारत एकमेव विजयी गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पाकिस्तानविरुद्ध दक्षिण कोरिया या सामन्यात पाकिस्तानने 5-2 अशा फरकाने दक्षिण कोरियाचा पराभव करत तिसरे स्थान पटकावले.

या विजयासोबत टीम इंडिया सर्वाधिक 5 वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 2011, 2013 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले होते. तर 2018 साली टीम इंडियाला पाकिस्तानसोबत संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.