यजमान हिंदुस्थानने मलेशियाविरुद्ध गोलचौकार ठोकत 4-0 गोलफरकाने धुक्वा उडवीत महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत दणदणीत सलामी दिली. लढतीतील दुसरा क्वॉर्टर वगळता सर्वच क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी गोल केले. संगीता कुमारीने दोन गोल ठोकत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पहिल्या मिनिटापासून आक्रमक झालेल्या हिंदुस्थानला आठव्या मिनिटाला लगेचच फायदा झाला. संगीता कुमारीने हा सुरेख गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानकडे 1-0 आघाडी होती. दुसऱया क्वॉर्टरमध्ये एकही गोल झाला नाही. मग तिसऱया क्वॉर्टरमध्ये प्रीती दुबेने 42 व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0ने वाढविली. मलेशियन खेळाडू हिंदुस्थानच्या संरक्षक फळीपुढे निप्रभ ठरत होत्या. त्यानंतर लगेच 43 व्या मिनिटाला उदिताने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. सामना हातातून निसटल्याचे कळून चुकल्याने मलेशियन खेळाडूंवर कमालीचे दडपण आले. मग 55 व्या मिनिटाला संगीता कुमारीने आणखी एक गोल करीत हिंदुस्थानला 4-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी टिकवीत यजमान संघाने एका रुबाबदार विजयाची नोंद केली. आता उद्या (दि. 12) दुसऱया लढतीत हिंदुस्थानची गाठ दक्षिण कोरियाशी पडणार आहे. आणखी एका लढतीत चीनने थायलंडची 15-0 गोलफरकाने दाणादाण उडविली.
कोरियाने जपानला बरोबरीत रोखले
दुसऱया लढतीत जपान व दक्षिण कोरिया यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. शेवटी कोरियाने जपानला 2-2 असे बरोबरीत रोखले. कर्णधार तकाशा साकी हिने पाचव्या मिनिटाला गोल करीत जपानचे खाते उघडले. मग पार्क मिहयांगने 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत कोरियाला 1-1 असे बरोबरीत आणले. त्यानंतर 35 व्या मिनिटाला ओशिमा नटसुमीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत जपानला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जपान विजयाकडे वाटचाल करीत असताना 57 व्या मिनिटाला ली यूजीनने भन्नाट मैदानी गोल करीत दक्षिण कोरियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अखेर ही रोमहर्षक लढत अनिर्णित अवस्थेत सुटली.
.