रुग्णालयातच संचालिकेची गोळ्या झाडून हत्या, बिहारमधली धक्कादायक घटना

बिहारमध्ये खासगी रुग्णालयातच गोळ्या झाडून संचालिकेची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गोळ्या झाडल्याचा आवाज कुणालाच आला नाही. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला या संचालिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर जखमी संचालिकेवर उपचार करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार बिहारची राजधानी पाटण्यात खासदी रुग्णालय एशिया रुग्णालयात संचालिका सुरभी राज यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेच्या दोन तासांनंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावर काही धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी ना गोळ्यांचा आवाज ऐकला ना कुणाला पळून जाताना पाहिलं.

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, शनिवारी दुपारी 2.15 च्या सुमारास रुग्णालयात बैठक आणि प्रशिक्षण सुरू होतं. तीन वाजता ही बैठक संपली आणि सर्व कर्मचारी हॉलमधून निघून गेले. रुग्णालयाचा एक कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्यांना संचालिका सुरभी राज या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. या कर्मचाऱ्याने आरडा ओरड करून इतर कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि त्यांनी तातडीने सुरभी यांना रुग्णालयातल्या डॉक्टरांकडे नेलं. पण सुरभी या शुद्धीवर आल्या नाही म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल केलं. पण एम्समध्ये उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की गोळी झाडल्याचा कुठलाही आवाज त्यांना आला नाही. तसेच कुणीही पळून जाताना दिसलं नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.