Asia Cup 2025 India – प्रतिक्षा संपली! 35 वर्षांनंतर हिंदुस्थानात रंगणार आशिया चषकाचा थरार

आशिया चषक 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर 35 वर्षांनंतर आशिया चषकाचे आयोजन करण्याची जबाबदारी हिंदुस्थानच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र हिंदुस्थानचा कट्टर प्रतिस्पर्धी यामध्ये खोडा घालण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानात 1990-91 मध्ये आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तशी संधी हिंदुस्थानला मिळाली नव्हती. अखेर 35 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हिंदुस्थानला आशिया चषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. 2023 मध्ये आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे आशिय चषक श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संयुक्त आयोजनात पार पडला. त्यामुळे 2025 मध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या आशिया चषकात पाकिस्तान खोडा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पाकिस्तानने हिंदुस्थानात येण्यास नकार दिला, तर समस्या निर्माण होऊ शकते.

Asian Cricket Council (ACC) ने जारी केलेल्या निविदेनुसार, 2025 मध्ये होणारा आशिया चषक हिंदुस्थानात टी-20 फॉरमॅटमध्ये पार पडणार आहे. तसेच 2027 मध्ये होणारा आशिया चषक बांग्लादेशमध्ये वन डे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या दोन्ही पुरुष आशिया चषक स्पर्धेत (हिंदुस्थान आणि बांग्लादेश) प्रत्येकी 13 सामने होणार असून 6-6 संघांचा यामध्ये सहभाग असणार आहे. या 6 संघांमध्ये हिंदुस्थान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका या 5 संघांचा सहभाग निश्चीत आहे, तर सहावा संघ हा पात्रता फेरीद्वारे निश्चीत करण्यात येईल.