तेरा वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले आणि त्या वादळात साखळीत अपराजित राहिलेला श्रीलंकेचा संघ उडाला. श्रीलंकेचा डाव 173 धावांत गुंडाळल्यानंतर वैभवच्या 36 चेंडूंतील 67 धावांच्या झंझावाताने हिंदुस्थानला 21.4 षटकांतच म्हणजे 170 चेंडू आणि 7 विकेट राखून युवा आशिया चषकाची अंतिम फेरी गाठून दिली. आता रविवारी आशिया कपसाठी हिंदुस्थानचा संघ बांगलादेशविरुद्ध भिडेल. बांगलादेशने पाकिस्तानचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीचा सामना जिंकला.
अपराजित संघांना धक्का
आज उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका हे साखळीत अपराजित असलेल्या संघांना पराभवाचा धक्का बसला. पाकिस्तानने ‘अ’ गटातून विजयाची हॅटट्रिक साजरी केली होती तर श्रीलंका ‘ब’ गटातून सलग तीन विजयांमुळे टॉपवर होते, पण या दोन्ही संघांच्या विजयाची मालिका खंडित करण्यात पराभूत संघांना यश लाभले. साखळीत हिंदुस्थानवर पाकिस्तानने मात केली होती, तर बांगलादेशला श्रीलंकेकडून पराभवाची झळ बसली होती. आज हिंदुस्थान आणि बांगलादेशने एकमेकांना हरवलेल्या संघांचा खेळ खल्लास केला.
पाकिस्तानची दाणादाण
साखळीत एकापेक्षा एक विजयाची नोंद करणाऱ्या पाकिस्तानची उपांत्य फेरीत दाणादाण उडाली. इक्बाल होसैन इमॉनच्या माऱ्यापुढे त्यांचा 116 धावांत संघ गारद झाला आणि बांगलादेशने कर्णधार अजिजुल हकीमच्या 42 चेंडूंतील 61 धावांच्या खेळीने 22.1 षटकांतच विजयी लक्ष्य गाठले आणि आपले आशिया कप राखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
हिंदुस्थान नवव्यांदा बाजी मारणार
19 वर्षांखालील मुलांच्या आशिया कपच्या दहा स्पर्धांपैकी आठ स्पर्धा एकट्या हिंदुस्थाननेच जिंकल्या आहेत. पहिल्या सलग नऊ स्पर्धांच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानी संघ सातत्याने खेळला. केवळ 2017 साली अफगाणिस्तानकडून हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला होता. मात्र गेल्या स्पर्धेत बांगलादेशने हिंदुस्थानचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले होते आणि तेच स्पर्धेचे विजेते ठरले. आता बांगलादेश सलग दुसरे जेतेपद पटकावणार की हिंदुस्थान नवव्यांदा आशिया कपचा विजेता ठरणार, हे रविवारच कळेल.
मूर्ती छोटी, फटके मोठे
13 वर्षीय वैभव सूर्यवंशी स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे, पण त्याचे फटके पाहून सारेच थक्क झाले. यूएईविरुद्ध 143 धावांची सलामी देणाऱ्या वैभव-आयुषच्या जोडीने आज लंकन गोलंदाजीला चोप चोप चोपले. दोघांनी 8.3 षटकांतच 91 धावांची सलामी देत हिंदुस्थानचा मोठा विजय निश्चित केला. आयुष 34 धावांवर बाद झाला तर वैभवने आपला घणाघात कायम राखत 6 चौकार आणि 5 षटकारांचा वर्षाव करत 67 धावा ठोकल्या. या झंझावातामुळे हिंदुस्थानने 22 व्या षटकांतच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वैभवने गेल्या सामन्यातही 46 चेंडूंत नाबाद 76 धावा काढल्या होत्या.
चेतन शर्माची खतरनाक सुरुवात
साखळीत श्रीलंकेने सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते, मात्र आज चेतन शर्माने दिलेल्या दणक्याने लंकन संघ अक्षरशः हादरला. चेतनने दुलनिथ सिगेरा आणि विमथ दिनसारा सलग चेंडूंवर बाद केले, पण त्याची हॅटट्रिक लकविन अभयसिंघेने पूर्ण होऊ दिली नाही. बिनबाद 8 वर असलेला लंका या हादऱ्यांनी 3 बाद 8 वर पोहोचला, मात्र तीन धक्क्यातून शरुजन षण्मुगनाथन (42) आणि लकविन अभयसिंघेने (69) सावरले. दोघांनी केलेल्या 93 धावांच्या भागीमुळे श्रीलंकेने धावांची शंभरी गाठली. लकविनने आपल्या झुंजार खेळाने लंकेचा डाव 167 पर्यंत नेला, मात्र तो बाद झाल्यानंतर लंकेचा डावही 173 धावांवर थांबला. हिंदुस्थानच्या चेतन शर्माने 34 धावांत 3 तर किरण चोरमाळे आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले.