
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी हत्याकांडाचा निकाल येत्या ५ एप्रिल रोजी लागणार आहे. ११ एप्रिल २०१६ मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे ७ वर्षे चालली. या खटल्यात न्यायालयाने सुमारे ८० साक्षीदार तपासले. पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे येत्या शनिवारी निकाल जाहीर करणार आहेत.
अश्विनी बिद्रे यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने आपल्या मीरा रोड येथील घरात ११ एप्रिल २०१६ च्या रात्री हत्या केली होती. त्यानंतर त्याने आपले सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने अश्विनी यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या करवतीने लहान लहान तुकडे केले. हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्यांची वसईच्या खाडीत विल्लेवाट लावली होती. याप्रकरणी अभय कुरुंदकर याला ७ डिसेंबर २०१७रोजी तर दुसरा आरोपी राजू पाटील याला १० डिसेंबर २०१७ रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भंडारी आणि फळणीकर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सर्वच आरोपी गजाआड झाल्यानंतर याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
■ २७ जुलै २०१९ रोजी या खटल्याची नोंदणी न्यायालयात झाली. सुरुवातीला खटल्याची सुनावणी अलिबाग न्यायालयात चालली. नंतर हा खटला पनवेल सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला.
■ न्यायालयाने या खटल्यात आतापर्यंत सुमारे ८० साक्षीदार तपासले आहेत. त्यामध्ये अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे, पती राजू गोरे यांचा समावेश आहे.
■ इतक्या मोठ्या संख्येने साक्षीदार असल्यामुळे निकाल तयार करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. हे काम पूर्ण झाले आहे.
निर्णयाकडे पोलीस दलाचे लक्ष
पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या खटल्याच्या या निकालाकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. अभय कुरुंदकर हा पोलीस दलाचा लाडका अधिकारी होता. त्यामुळे सुरुवातीला त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. नवी मुंबई पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी जीवाचा मोठा अटापिटा केला. मात्र पोलीस दलात लेडी सिंगम म्हणून ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कुरुंदकर आणि अन्य आरोपींच्या पापाचा घडा भरला. गेल्या सात वर्षांपासून हे सर्वच आरोपी न्यायालीन कोठडीत आहेत.