
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आपली निर्दोष मुक्तात होईल या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आरोपी अभय कुरुंदकर हा निकालाच्या आदल्या दिवशी कारागृहात फिदीफिदी हसत होता. कारागृहातील शेवटचा दिवस म्हणून त्याने सहकारी कैद्यांचा निरोपही घेतल्याचे समजते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही हात मिळवत कुरुंदकर पनवेलच्या कोर्टात पोहोचला. मात्र पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर करून हत्येत दोषी ठरवताच क्रूरकर्मा कुरुंदकरचा भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्याला पुन्हा तळोजा कारागृहात जावे लागले.
न्यायालयाने कुरुंदकरला दोषी ठरवले त्याच्या आदल्या दिवशी तो खो खो हसून आज माझा जेलमधील शेवटा दिवस आहे, असे सर्वांना सांगत सुटला होता. भलताच खूश असलेल्या कुरुंदकरने एक प्रकारे सर्वांचा निरोपच घेतल्यासारखा त्याचा अविर्भाव होता. असे बंदोबस्तावरील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर झाल्यानंतर कुरुंदकरच्या नातेवाईकांनी न्यायालयातून काढता पाय घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्य कधी मावळले हे कोणालाच कळले नाही.
पोलीस कोठडीतही गब्बरसिंग स्टाईल हसला होता
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी अभय कुरुंदकरला कळंबोली पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यावेळी न्यायालयात जाण्यापूर्वी एक दिवस आगोदर तो पोलीस कोठडीत रात्रभर गब्बरसिंग स्टाईल हसत होता. उद्या मी या कोठडीतून बाहेर येणार अशा आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता. मात्र त्यावेळी त्याचा हा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स ठरला. त्याचा मुक्काम गेल्या सात वर्षांपासून जेलमध्ये आहे.