माझ्या आईला क्रूरपणे मारले, ‘त्याला’ फासावर लटकवा! अश्विनी बिद्रेच्या लेकीचा पनवेल न्यायालयात टाहो

माझ्या आईची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहाची अमानुषपणे विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला फासावर लटकवा, असा टाहो सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची कन्या सुची हिने आज पनवेल जिल्हा न्यायालयात फोडला. अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे यांनीही आरोपीला कठोर शिक्षा देण्याची विनवणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांना केली. नात आणि आजोबांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या खटल्यातील आरोपींच्या शिक्षेचा फैसला न्यायालय आता येत्या २१ एप्रिल रोजी करणार आहे. मुख्य आरोपीला जन्मठेप होते की मृत्युदंड मिळतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाच्या निकालावर सध्या पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवले. कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर मृतदेहाची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करण्याचा ठपका ठेवण्यात आला. आरोपींच्या शिक्षेचा फैसला करण्यापूर्वी न्यायालयाने अश्विनी यांची मुलगी सुची आणि वडील जयकुमार बिद्रे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना न्यायालयात हजर ठेवण्याची सूचना सरकारी वकील प्रदीप घरत यांना केली होती. त्यानुसार सुची आणि जयकुमार बिद्रे आज झालेल्या सुनावणीला उपस्थित राहिले. आरोपींनी माझ्या आईला फार निर्दयीपणे मारले आहे. त्यामुळे आरोपींना जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी नात आणि आजोबांनी न्यायालयाकडे केली. यावेळी न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो, अश्विनी यांचे पती राजू गोरे, भाऊ आनंद बिद्रे आदी उपस्थित होते.

अन् लेकीच्या अश्रूचा बांध फुटला

अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांनी केलेल्या संघर्षाची सुची गोरे ही साक्षीदार आहे. नऊ वर्षांपूर्वी आजच्या तारखेलाच कुरुंदकरने अश्विनी यांची हत्या केली होती. ज्या दिवशी आईची हत्या झाली, त्याच तारखेला न्यायालयात प्रवेश केल्यानंतर सुचीच्या अश्रूचा बांध फुटला. आईच्या आठवणीने तिने हंबरडा फोडला. त्यामुळे गर्दीन भरलेले न्यायालय एकदम स्तब्ध झाले. आईकडे पाहून मला पोलीस व्हायचे होते. मात्र आई पोलीस अधिकारी असूनही तिची हत्या झाली. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळे पोलीस दलावरचा विश्वास उडाला आहे, अशी नाराजी यावेळी सुचीने व्यक्त केली.

शिक्षेबाबत न्यायालयाने तिन्ही आरोपींचे मत जाणून घेतले. माझ्या पत्नीला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. मुलगा घरात एकटाच कमवता आहे, मला सोडून द्या, अशी गयावया कुंदन भंडारी या आरोपीने केली.

माझा या गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही. माझी शिक्षा कमी करण्यात यावी, असा टाहो यावेळी गुन्ह्यातील तिसरा आरोपी महेश फळणीकर याने फोडला. फळणीकर हा कुरुंदकरचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होता.