
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने आज त्याला दोषी ठरवले. अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ठपका न्यायालयाने कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर ठेवत आरोप निश्चित केले. या हत्याकांडात कोणताही सहभाग आढळून न आल्यामुळे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कुरुंदकरसह अन्य दोन आरोपींना न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहेत.
कुरुंदकर याने मीरा रोड येथील आपल्या घरी 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांच्यासह एकूण 84 साक्षीदार या खटल्यात न्यायालयाने तपासले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत व आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
मुलीच्या उपस्थितीत सुनावणार शिक्षा
सुनावणीदरम्यान न्यायालयात अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे, पती राजू गोरे, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आदी उपस्थित होते. मात्र यावेळी अश्विनी यांची मुलगी सुची आणि वडील जयकुमार बिद्रे हे उपस्थित नव्हते. या खटल्यात अश्विनी यांची हत्या झाली असली तरी खरी अन्यायाची बळी ही त्यांची मुलगी सुची ठरली आहे. तिला लहान वयात आपली आई गमवावी लागली आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा देताना तिच्या भावनांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढील सुनावणीवेळी सुची आणि जयकुमार बिद्रे यांना न्यायालयात उपस्थित ठेवावे, असे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी सरकारी वकिलांना सांगितले.
0