>> अश्विन बापट
थोरामोठ्यांनी आपल्यावर स्वच्छतेचं महत्त्व वेळोवेळी ठसवलंय. याच स्वच्छतेचा आणि हवेतील दूषित घटकांना दूर करत आरोग्यदायी वातावरण निर्मितीचा ध्यास घेतला आहे सिरमॅक्सो कंपनीच्या भाटवडेकर दांपत्याने. त्यांच्या सिरमॅक्सो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडने या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.
सिरमॅक्सो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी संचालक कल्पना भाटवडेकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, याची सुरुवात माझे सासरे सुरेश भाटवडेकरांनी 1978 मध्ये केली. या प्रवासाला त्यांची पत्नी हेमा भाटवडेकर यांची सुयोग्य आणि प्रभावी साथ मिळाली. क्वाटरनरी रसायन, जंतुनाशक म्हणून भारतात पहिल्यांदा वापर करण्यात आले. तिथून पुढे 20-22 वर्षे त्यांनी या कामात सातत्य राखलं. मग 2002 ला माझे पती जयदीप आणि मी कंपनीत जॉईन झालो. आजच्या घडीला आम्ही 100 उत्पादनं बनवू शकतो, तर त्यातील 80 उत्पादनं आताच्या घडीला प्रत्यक्ष सुरू आहेत. यात अर्थातच सॅनीक्रब, सॅनीजेल यासारखी विविध उत्पादनं आहेत. आमचा ग्राहक वर्ग हा प्रामुख्याने हॉस्पिटल्स, फार्मा कंपन्या, अॅनिमल हसबंड्री, शिक्षण संस्था आहेत. जिथे कार्यरत लोकांच्या आरोग्याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आमची उत्पादनं महत्त्वाची ठरतात. तसंच वाहतूक क्षेत्र, विविध ऑफिसेस, हॉटेल व्यवस्थापन या ठिकाणीदेखील आमची स्वच्छता उत्पादनं नियमित वापरली जातात. देशभरात बहुतेक सर्वच राज्यांमध्ये आमची उत्पादनं पोहोचलीत. तर 2004 मध्ये निर्यात सुरू केल्यावर आफ्रिका, युरोप, आशियामधल्या अनेक देशांमध्ये आमचा व्यवसायाचा विस्तार झाला आहे.
आम्ही उत्पादनांच्या दर्जाबाबत अत्यंत सजग आणि सतर्क आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमधून आमची उत्पादनं चाचणीत उत्तीर्ण होऊन तावून सुलाखून निघतात. तारापूर एमआयडीसीमध्ये आमचे दोन प्लांट्स आहेत. आमच्याकडे 250 कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.
कंपनीच्या SIRMAXO या नावासंदर्भात कल्पना यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, SIRMAXO मधील `SIR` ही पहिली तीन अक्षरं या कंपनीचे प्रणेते सुरेश आणि त्यांच्या आई सुशीला यांच्या नावांची प्रातिनिधिक आद्याक्षरं आहेत. तर, `MAXO` ही चार अक्षरं म्हणजे सासऱयांची सुरेश भाटवडेकरांची ध्येयासक्ती. आपण जे करू ते सर्वात उच्च, मॅक्झिमम असा त्यांचा आग्रह. त्याला वाहिलेली ही चार अक्षरं.
कंपनीमध्ये माझे पती जयदीप सेल्स, मार्केटिंग, फायनान्स, लॉजिस्टिक्स ही जबाबदारी सांभाळतात. तर, मी प्लांट, आर अँड डी, एचआर, आयटी यासारख्या विभागांकडे बारकाईने लक्ष ठेवून असते.
आमच्या कंपनीला `ISO 14001’सह विविध प्रमाणपत्रं मिळाली आहेत. भविष्यात केवळ स्वच्छताच नव्हे तर इन्फेक्शन कंट्रोलचं महत्त्वही आम्हाला लोकांमध्ये ठसवायचंय. आम्ही प्रयत्न सुरू केलेत. यासाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहोत. हॉस्पिटल्समध्ये काही मार्गदर्शनपर व्याख्याने देऊन आणखी जागरुकता वाढवण्यासाठी आम्ही पावलं टाकत आहोत. तसंच शैक्षणिक संस्थांमध्येही संस्कारक्षम वयातल्या मुलांमध्ये हा अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही पुढच्या पाच वर्षांमध्ये आणखी जोमाने प्रयत्न करणार आहोत, असंही कल्पना यांनी आवर्जून सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर -सीनियर न्यूज अँकर आहेत.)