
>> अश्विन बापट
एखाद्या व्यक्तीची पहिली ओळख म्हणजे त्याचे राहणीमान आणि त्याची ड्रेसिंग स्टाईल, अर्थात त्याचा पोशाख यावरून होत असते असे म्हटले जाते. याच पोशाखाची अर्थात कपडय़ांची देखभाल करणारी एक भव्य लाँड्री एका मराठमोळ्या उद्योजकाने सुरू केली आहे. त्यांचं नाव तुषार देशमुख.
चकाचक कपडे, कडक इस्त्राrची घडी करणाऱया चाकणच्या तुषार देशमुखांचा लाँड्री व्यवसाय जोरात सुरू आहे. एका इमारतीत दोन मजल्यांवर हा लाँड्रीचा व्यवसाय सुरू आहे. देशमुखांकडून याबद्दल अधिक जाणून घेतलं, ते म्हणाले, मी मूळचा जुन्नरमधील नळवणे गावचा. बीई मेकॅनिकल पदवी घेतली आणि मुंबईत रिलायन्स कंपनीत नोकरी करू लागलो. तेव्हा माझा ओढा शहरासोबत गावाकडेही होता. साहजिकच गावची नाळ कायम राहावी, यासाठी एक प्रतिष्ठान स्थापन केलं आणि सामाजिक उपाम सुरू केले.
मी 2011 ते 2015 अशी चार वर्षे नोकरी केली. 2015 मध्ये गावच्या राजकारणात रस घेतला, सरपंच झालो. त्याच दरम्यान लग्न झालं. पुढे मुलगी झाली. कौटुंबिक जबाबदारी वाढू लागली. तेव्हाच कुटुंबाला विश्वासात घेऊन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मन गावात गुंतलं होतं आणि काहीतरी स्वबळावर करण्यासाठी धाव घेतच होतं. आमचे एक मित्र सोपान शिंदे मुंबईत छोटीशी लाँड्री चालवत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मीही मग लाँड्री सुरू करायचं ठरवलं. याकरता पुणे, नगरसारख्या ठिकाणी जाऊन लाँड्री व्यवसायाची पाहणी केली. अभ्यास केला. त्या सुमारास माझं लग्न झालं. सासऱयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आर्थिक पाठबळ दिलं. तीन मशीन्स आणि 10 ते 12 जणांसह 2016-17 मध्ये तीन गुंठे जागेत लाँड्री सुरू केली.
साधारण 20 ते 25 लाखांच्या मशीनरीपासून सुरू झालेला माझा व्यवसाय आज दोन कोटींच्या मशीन सेटअपपर्यंत पोहोचला आहे. अंदाजे साडेचार हजार स्क्वेअर फूट जागेत आज माझा लाँड्री व्यवसाय सुरू आहे. आजमितीला लाँड्रीव्यतिरिक्त हॉटेल तसंच कँटिन व्यवसायही मी चालवतो. तिन्हींत मिळून अंदाजे 60 च्या घरात कर्मचारी आहेत. लाँड्रीसाठी सुमारे 25 कर्मचारी आहेत. त्यातील 10 महिला आहेत.
आमच्या लाँड्रीत उद्योगसमूह, हॉटेल्स तसंच सर्वसामान्य ग्राहक अशा तिघांनाही आम्ही सुविधा देतो. उद्योगसमूहांसाठी सीट्स, अॅप्रनसारखे कपडे ज्याची आम्ही देखभाल करतो. तर हॉटेल्ससाठी बेडशीट्स, पडदे यासारख्या कपडय़ांची जबाबदारी आम्ही सांभाळतो. दिवसाला सुमारे दोन हजार कपडे धुण्याची, इस्त्राrची ऑर्डर आम्हाला मिळत असते. हा व्यवसाय अत्यावश्यक सेवांसारखा असल्याने आम्ही सुट्टी घेत नाही. आमच्या स्टाफला गुरुवार आणि रविवार अशा आलटून-पालटून सुट्टय़ा देतो.
या व्यवसायात प्रचंड पोटेन्शियल आहे. मराठी माणसांनी याकडे वळायला हवं. यासाठी मी महाराष्ट्रभरातून माझ्याकडे येणाऱया उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शन करत असतो. अगदी देवस्थानांच्या भक्तनिवाससाठीही लाँड्री सुविधा गरजेची असते. त्यामुळे अशा देवस्थानांचं विश्वस्त मंडळही आमच्याकडे येऊन माहिती घेतं आणि आम्हीही त्यांना त्यादृष्टीने मार्गदर्शन करतो. सध्या चाकण परिसरात आमचा व्यवसाय सुरू आहे. दोन कलेक्शन पॉइंट्सही आजूबाजूला आम्ही सुरू केलेत. जिथून कपडे जमा करून मुख्य लाँड्रीत ते धुतले किंवा इस्त्राr केले जातात आणि परत ते पार्सल त्या कलेक्शन पॉइंटला पोहोचतं. भविष्यात पुणे, चिंचवड, रावेत, मुळशी अशा ठिकाणीही असे कलेक्शन पॉइंट्स आम्ही सुरू करणार आहोत.
लोक आपल्या पेहरावाबद्दल खूप सजग झालेत. खास करून मध्यम वर्ग अधिक जागरुक झाला आहे. लोकांचा कडक इस्त्राr केलेले कपडे घालण्याचा कल आता वाढला आहे. र्प्वी इस्त्राr केलेले कपडे एक टक्का लोक घालायचे. ज्यामध्ये श्रीमंत वर्गाचंच प्रमाण होतं. ही टक्केवारी आता मध्यम वर्गाच्या प्रतिसादामुळे 40 वर गेली आहे. तर 20 टक्के लोक हे लाँड्रीत स्वच्छ धुऊन आलेले कपडे परिधान करणं पसंत करतात. लाँड्री व्यवसायाला पावसाळ्याचे एक-दोन महिने वगळता स्लॅक सीझन नाही. अगदी कोरोनासारख्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळातही कोरोना सेंटरच्या कपडय़ांचं काम हाती घेऊन आमचं आर्थिक गणित सुरू ठेवलं होतं. लग्न, इव्हेंट्स यांचं वाढतं प्रमाण पाहता तुम्ही जर योग्य नियोजन केलं आणि संयम राखलात तर या व्यवसायासाठी भविष्यकाळ उज्ज्वल आहे. मीही या व्यवसायात येणाऱया काळात अधिकाधिक लोकांना सुविधा पुरवण्यासाठी त्यात तंत्रज्ञान, मशीनरीचा अधिक वापर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देशमुख यांनी आवर्जून सांगितलं.
तुषार देशमुख
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर –
सीनियर न्यूज अँकर आहेत.)