उद्योगविश्व- सायबर सिक्युरिटीमध्ये महासत्तेचे स्वप्न

>> अश्विन बापट

सायबर सुरक्षा! आधुनिक जमान्यातला हा परवलीचा शब्द आणि तुमच्याआमच्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा झालेला विषय. दिवसेंदिवस इंटरनेटचा जसा प्रसार होतोय तशीच त्यातली जोखीमही समोर येतेय. सायबर अॅटॅकची समस्या तर डोकं वर काढून जगभरातल्या देशांना, मोठमोठय़ा संस्थांना नाकीनऊ आणतेय. याच सायबर हल्ल्यांशी आणि संबंधित समस्यांशी दोन हात करण्यासाठी एक मराठी पाऊल ई-विश्वात पडलंय. त्यांचं नाव आहे डॉ. मंगेश आमले. त्यांची वेलॉक्स सोल्युशन ही कंपनी सायबर सुरक्षेसाठी लागणारी सॉफ्टवेअर पुरवते. इतक्या वेगळ्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱया आमले यांना त्यांच्या प्रवासाविषयी विचारलं असता ते म्हणाले, मी मूळचा जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावचा. घरची पार्श्वभूमी शेतीची. दहावीपर्यंतचं शिक्षण गावीच झालं. मग 12वीला पुण्यात गेलो. ऑफिस बॉय म्हणून पार्टटाइम नोकरी केली. आयआयटी बाम्बेमधून व वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी येथून मी मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं, आयआयटी जम्मूमधून सायबर सिक्युरिटीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं. युरोपियन युनिवर्सिटीमधून डॉक्टरेट केली.

पार्ट टाइम काम करताना माझा पहिला पगार होता 500 रुपये. आज माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे एक हजार कोटी. असं असलं तरी ही वाट सोपी नव्हती. याकरता मी खूप मेहनत घेतलीय. संघर्ष केलाय. पार्ट टाइम नोकऱया करत करत अग्रगण्य बँकेत मी जॉब करू लागलो. 2011पर्यंत मी तो जॉब केला. त्याच सुमारास होत असलेला इंटरनेटचा विस्तार आणि त्याला जोडून होणारे सायबर संबंधित प्रश्न मला स्वस्थ बसू देईनात. आपण यामध्ये काहीतरी करायला हवं, या ध्येयाने मी झपाटला गेलो. आपल्या देशातील सायबर सुरक्षा आपल्याच देशातल्या नागरिकाने पुढाकार घेऊन केली तर देशातल्याच लोकांना रोजगारही मिळेल, देशाचंही नाव होईल या हेतूने मी मोठय़ा बँकेतली मोठय़ा पगाराची नोकरी सोडून 2012मध्ये वेलॉक्स सोल्युशन ही कंपनी सुरू केली. पाच इंजिनीयर्सच्या साथीने सुरू केलेली ही कंपनी आजमितीला माझ्या नवी मुंबई ऑफिसमध्ये 265चा स्टाफ आहे. आज बँकिंग सिक्युरिटीमध्ये देशातील 60 टक्के काम माझी कंपनी करते. सुमारे 111 बँकांचं काम माझी कंपनी पाहते. तसंच टेलिकॉम सिक्युरिटीमध्येही माझी कंपनी कार्यरत आहे. याव्यतिरिक्त हार्ड डिस्क एनक्रिप्शनमध्येही माझ्या कंपनीचं काम मोठं आहे. हार्ड डिस्कचा जो डेटा असतो त्याचं हॅकिंग होऊ नये यासाठी लागणारी यंत्रणा माझ्या कंपनीने निर्माण केलीय.

दोन वर्षांपूर्वी मी शिकागोमध्ये कंपनीची शाखा सुरू केलीय. तिथे 22 जणांची टीम कार्यरत आहे. तसंच महिला सबलीकरणसाठी देशातलं पहिलं वुमन सेंट्रिक सायबर सिक्युरिटी सेंटर, कर्नाटक सरकारच्या पुढाकारामुळे आम्ही म्हैसूरमध्ये सुरू केलंय. या सेंटरचं वैशिष्टय़ म्हणजे स्टाफमध्ये सर्व महिला आहेत. शिपायापासून ते प्रमुखापर्यंत 100 महिला या ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. गुजरात सरकारच्या निमंत्रणावरूनही आम्ही नुकताच एक करार केला असून तिथेही आमचं ऑफिस सुरू होणार आहे.

मी अमेरिका, दुबई, सिंगापूरला सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतो. तसंच देशविदेशात मला या विषयाशी संबंधित मार्गदर्शनपर व्याख्यानं देण्यासाठीही निमंत्रणे येत असतात. अलीकडेच नेपाळमध्ये मी तिथल्या बँकांसाठी सायबर सिक्युरिटी सेशन घेतलं. या वेळी नेपाळच्या 200 बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपल्या देशाला सायबर सिक्युरिटीमधली महासत्ता करण्याचं माझं स्वप्न आहे. यादृष्टीने येणाऱया काळात युरोपमध्येही कंपनीचा विस्तार करण्याचा माझा मानस असल्याचे आमले यांनी अधोरेखित केले.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)