उद्योगविश्व – चवदार सरबतं आणि बरंच काही…

>> अश्विन बापट

कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम सोल. प्रदीप शेवडेंच्या ओमकार ब्रँडची ही उत्पादनं राज्यासह देशात ठिकठिकाणी पोहोचलीत. त्यांचा आवळा मावा, आवळा कँडी पचनशक्ती सुधारण्यासाठी खवय्यांना उपयुक्त ठरत आहे..

ओमकार प्रॉडक्ट्सच्या वाटचालीबद्दल ओमकारचे मालक प्रदीप शेवडेंकडून अधिक जाणून घेतलं.

ते म्हणाले, आम्ही कुडाळच्या सरंबळ गावातले. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय. कोकम, काजूची झाडं घरात होती. शेती असल्याने ती कसण्यावर भर होता. म्हणून आमचं शिक्षणाकडे काहीसं दुर्लक्ष झालं. तरी माझ्या मामाने मी 1985 मध्ये दहावी झाल्यावर मला सावंतवाडीत आणलं. तिथून माझा पुढचा प्रवास सुरू झाला. मामाचा लग्नाचा हॉल होता. तिथे मी त्याला मदत करत असे. तिथेच मला व्यवसायाची आवड निर्माण झाली. बांद्याचे कोकम व्यावसायिक शशी पित्रे यांनी मला या उद्योगात पाय रोवण्यासाठी मोलाची मदत केली. मग 1992 मध्ये सावंतवाडीच्या उद्यमनगरमध्ये पहिला प्लॉट विकत घेतला. तिथे 1993 मध्ये आमचं स्वतचं प्रॉडक्शन युनिट सुरू झालं. तेव्हा माझ्या सोबत अवघे दोन कर्मचारी होते. आज 31 वर्षांनंतर याच परिसरात आमच्या तीन फॅक्टरी उभ्या आहेत. आमच्याकडे आज 40 जण पूर्णवेळ कामगार, तर सीझननुसार 20 ते 25 कंत्राटी कामगार कामं करतात. कोकमच्या तीन उत्पादनांनी सुरू केलेला हा व्यवसाय 65 उत्पादनांवर पोहोचलाय.

आमचं कोकम सरबत हे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे. दिवसाला दोन हजार लिटर सरबत, वर्षभरातील पावसाचे दोन महिने वगळता सहा लाख लिटर सरबत आम्ही तयार करत असतो, तर 600 ते 700 किलो मसाल्याची निर्मिती करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, हैदराबाद यांसारख्या देशाच्या विविध भागांत आमची उत्पादनं जात असतात. परदेशात अमेरिका आणि यूके या दोन्ही देशांत आमच्या प्रॉडक्ट्सना चांगली मागणी आहे. भविष्यात कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरी सरबत आणि रोझ सिरप अशी चार रेडी टू ड्रिंक सरबतं तयार करण्याचा आमचा मानस आहे, असंही प्रदीप शेवडे यांनी आवर्जून सांगितलं.