भाजपने घोडेबाजार करून मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. राजस्थानमध्ये यश आले नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार भाजपने चोरले. त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला घरी बसवा आणि महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांनी आज केले.
राजीव गांधी भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अशोक गेहलोत यांनी भाजप करीत असलेल्या घोडेबाजाराची उदाहरणे दिली. भाजपने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. राजस्थानमध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजपकडून जनतेची दिशाभूल
काँग्रेसच्या 5 गॅरंटी व मविआने वचननाम्यातून राज्यातील जनतेच्या हिताचे वचन दिले आहे. महिलांना दरमहा तीन हजार रुपये, मोफत बस प्रवास, 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतकऱयांना 3 लाखांची कर्जमाफी यारख्या लोकोपयोगी योजनांचे आश्वासन दिले आहे. भाजप फक्त जाहिरताबाजी करून जनतेची दिशाभूल करीत आहे. पण त्याला आता महाराष्ट्रातील जनता भूलणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य सेवा कोलमडली
राज्यात महायुती सरकारच्या काळात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडलेली आहे. मुंबईत 27 टक्के वैद्यकीय कर्मचारी कमी आहेत.एसआरआय, सिटीस्कॅन मशीन बंद आहेत, औषधांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधले.
आदित्यनाथांच्या घोषणांवर कारवाई नाही
भाजपचे एक मुख्यमंत्री ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’,चा नारा देत आहेत. पण निवडणूक आयोग त्यावर काहीच कारवाई करत नाही. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामागेही मोठे षडयंत्र असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.