‘बटेंगे तो कटेंगे’ वरून भाजपची फाळणी! मोदी, योगी, शहांच्या विधानाला मुंडे, चव्हाण, विखे-पाटलांचा विरोध

‘बटेंगे तो कटेंगे’ वरून भाजपचीच फाळणी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घसा कोरडा करून ‘एक है तो सेफ है’ असे सांगत असतानाच महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र हा नारा योग्य नसल्याची पिपाणी वाजवली आहे. अजित पवारांपाठोपाठ पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’च्या विरोधात जीभ उचलण्याचे धाडस केले आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा येथे चालणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यापाठोपाठ भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली. माझा या नाऱ्याला आपला पाठिंबा नसल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात असे विषय आणणे टाळले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र मिरज येथे पंकजा यांनी आपल्या भूमिकेवरून पलटी मारली. आपण जाहीर सभेत कुठेही हे वक्तव्य केले नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा योग्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यानंतर लगोलग राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या नाऱ्याच्या विरोधात सूर लावला. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपचीच फाळणी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी थेट मोदी-शहांच्या विरोधातच सूर लावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला. परंतु तो हवेतच विरला. त्यामुळे भाजपवरच ‘एक है तो सेफ है’ असे म्हणण्याची नामुष्की ओढवली आहे.