अजूनी रुसून आहे… अशोक चव्हाण व प्रतापराव चिखलीकर यांच्यातील दुरावा कायम

>> विजय जोशी

लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवानंतर 4 जून नंतर अर्थात निकाल लागल्यावर अशोक चव्हाण व प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी समोरासमोर येण्याचे टाळले असून, रविवारी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बोलविण्यात आलेल्या कुसूम सभागृहातील पुरस्कार सोहळ्याला चिखलीकर अनुपस्थित राहिल्याने दोघांतील दुरावा आणखी कायम असून, अजुनी रुसून आहे….अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये प्रवेश केला. जवळपास 55 नगरसेवक व शंभरहून नगरपंचायत, नगर परिषद सदस्य व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी बिलोली, देगलूर, अर्धापूर, भोकर येथे भाजपामध्ये प्रवेश केला. एवढा मोठा प्रवेश झाल्यानंतर व चव्हाणांची ताकद मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा विजय सोपा मानला जात होता. मात्र निवडणुकीचे निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी चिखलीकर यांचा दारुण पराभव केला.

निवडणुकीनंतर पक्षाच्या आदेशानुसार चिखलीकर यांनी सबंध जिल्हाभर मतदारांचे आभार मानण्यासाठी बैठका घेतल्या. पहिल्या दोन सभात त्यांनी ज्यांनी प्रामाणिक साथ दिली त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू, मात्र ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवू, असे जाहीर आव्हान दिले. बिलोली व देगलूर येथील आभार बैठकीत त्यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षात चलबिचल सुरु झाली. त्यानंतर चारच दिवसांनी त्यांनी पत्रकार परिषद घेवून अशोक चव्हाण हे भाजपातील नेते असून, आपला पराभव कशामुळे झाला याची कारणमिमांसा करुन सदरच्या वक्तव्यावर घुमजाव केले.

यानंतर भाजपा पक्षश्रेष्ठीने पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी सुरुवातीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नांदेडमध्ये पाठविले. या बैठकांना चव्हाण समर्थकांनी पाठ फिरवली. मुंबईला जायचे आहे व अन्य तांत्रिक कारणे सांगून हि मंडळी अनुपस्थित राहिली. स्वतः अशोक चव्हाण या बैठकीला अनुपस्थित राहिले. एवढेच काय नांदेड शहराची बैठक हॉटेल ताज पाटील येथे झाल्यानंतर त्याठिकाणी गोंधळ झाला. कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. हा सर्व प्रकार चिखलीकर मात्र निमुटपणे पाहत होते. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई येथील पक्षाची एक बैठक वगळता चिखलीकर व चव्हाण हे एकत्र दिसले नाहीत. पक्षाच्या बैठकीनाही चव्हाण यांनी अनुपस्थिती दर्शवली. काल सायंकाळी कुसूम सभागृहात डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यास चिखलीकर यांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते या सोहळ्याला अनुपस्थित राहिले. या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरविल्याने या दोघातील दुरावा आजही कायम आहे. 1995 पासून चिखलीकर व चव्हाण यांच्यातील राजकीय वैमनस्य अजूनही कायम असून, त्याचीच प्रचिती वेगवेगळ्या कार्यक्रमात येत आहे. सोपा वाटत असलेला विजय पराभवात रुपांतरीत झाल्याने चिखलीकर व त्यांचे समर्थक चव्हाणांवर संतापलेलेच आहेत. त्यातच 4 जून ते 14 जुलैपर्यंत दोघेही एकमेकांच्या समोर न आल्याने हा रुसवा कायम असल्याचे दिसून येत आहे. येणार्‍या काळात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत कोण कोणाला पाडणार हे आता बघायचे आहे.