सोहळा संस्कृती – समृद्ध करणारी पंढरीची वारी…

>> प्रशांत गौतम

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या पावलामागे पाऊल टाकत आपणही जावे असे अनेकदा वाटायचे. अखेर हा योग जुळून आला. वाखरी ते पंढरपूर हा अकरा किलोमीटरचा प्रवास करता आला. हाती भगवी पताका, कपाळी अष्टगंध आणि बुक्का, टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात वारी केली. भक्तिरसाची अनुभूती घेत वेगळ्याच भावविश्वाची प्रचीती आली.

पांडुरंगाच्या भेटीची आस, उत्सुकता लाखो वारकऱ्यांना असते. वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिकी अशा दोन मुख्य वाऱ्या महत्त्वाच्या असतात. तेच महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरेचे द्योतक आहे. वीस-बावीस दिवसांची ही वारी अनेक जण करतात. काहींच्या घरात परंपरा असते, छोट्या बालकांपासून ते शंभरी पार केलेले वृद्धही उत्साहाने सहभागी होत असतात. बावीस दिवसांत वारकरी अडीच-तीनशे किलोमीटरचे अंतर पायी चालून पूर्ण करतात. हरिनामाचा गजर करत ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत, हातात पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत पार करतात.

पंढरीचा पांडुरंग भक्त पुंडलिकाची आणि त्याच्या पंक्तीत बसणाऱ्या इतर भक्तांच्या भेटीसाठी वाट पाहत उभा आहे. पांडुरंग ज्या भक्त पुंडलिकाची वाट पाहत आहे, त्याविषयी सांगताना तुकोबा माऊली म्हणतात…
धन्य पुंडलिका बहु बरे केले
निधान आणिले पंढरीचे
अशा पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या लाखो भाविकांच्या उत्साहाला कधीही सीमा नसते.
वारीला मोठी परंपरा आहे. अनेक कुटुंबे, अनेक भाविक वर्षानुवर्षे लाडक्या विठूरायाची मनोभावे वारी करीत असतात. एकदा तरी हा अनुभव घ्यावा असे मनात होते. मात्र तेही छान जमून आले होते. दोन वर्षे वाखरी-पंढरपूर, दोन वर्षे पुणे ते सासवड (व्हाया दिवेघाट) अशी छोटी वारी करण्याचा योग चार वेळा येऊन गेला. यंदा आमच्या छोट्या वारीचे पाचवे वर्ष. त्यामुळे यंदा दोन्ही पालख्यांसोबत जाण्याचे नक्की केले. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि संतश्रेष्ठ तुकोबा माऊली या दोन्ही पालख्यांचे दर्शन पुण्यातच झाले. एक दिवस त्यांच्या पालखीसोबत लोणी-काळभोरपर्यंत वारीचा अनुभव आणि दुसऱ्या दिवशी सासवड ते जेजुरी हा वारी प्रवास खूप आनंददायी होता. याआधी दोनदा वाखरीचा, दोनदा दिवेघाटाचा अनुभव लक्षणीय असाच राहिला.

हाती भगवी पताका, कपाळी अष्टगंध आणि बुक्का, टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवार, 30 जून रोजी आळंदी येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. पाऊस सोबतीला होताच. त्याचा हलकासा शिडकावा होताच ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या घोषणेने अवघी अलकापुरी दुमदुमली.

आवडे देवासी तो ऐका प्रकार।
नामाचा उच्चार रात्रंदिवस।।1।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा।
हृदयी कळवळा वैष्णवांचा ।।2।।

याचा अनुभव प्रत्यक्ष घेणे नवीन प्रचीती देणारेच असते. वारीसोबत दोन वर्षे हडपसर-दिवेघाट-सासवड असा वेगळा अनुभव घेता आला. ज्ञानोबांची पालखी दिवेघाटमार्गे सासवडकडे जाते, तर तुकोबांची लोणीकंद येथे मार्गस्थ होते. पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणापासून ते नजीकच्या थांब्यापर्यंत सगळीकडे गर्दीच असते. पुणेकर वारकऱ्यांचा मनोभावे पाहुणचार करीत असतात. या संपूर्ण प्रवासाचा एकदा तरी साक्षीदार व्हायला हवे. मुखी हरिनामाचा गजर, अंतरी निर्मळ भक्तिभाव आणि पंढरीला जाण्याची आस अशा भारावलेल्या मनाने चालणारे वारकरी अशा वातावरणात ज्ञानोबांची पालखी दिवेघाटाचा टप्पा पार करते. घाटातील पालखीचे दृश्य विहंगम असते. माऊलींचा मुक्काम सासवडला दोन दिवस असतो. तेथून जेजुरीत मल्हाराच्या भेटीसाठी माऊली जातात. तेथून पुढचा प्रवास सुरू होतो. यंदा तुकोबाच्या पालखीसोबत पुणे ते लोणी-काळभोरपर्यंत आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत सासवड-जेजुरी हा टप्पा पार करता आला. हा अनुभव नवीन ऊर्जा देणारा असतो!

वाखरीचा अलौकिक आनंदसोहळा

वारी सोहळ्याचे जे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण असते ते वाखरी पंढरपूरपासून अकरा किलोमीटरवर आहे. तिथेच सर्व पालख्या एकत्र येतात. नयनरम्य रिंगण तिथेच होते. सर्व पालख्या दुसऱया दिवशी सकाळी मागेपुढे पंढरीकडे प्रस्थान ठेवतात. आपणही आयुष्यात एकदा तरी हा भागवत भक्तीचा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहावा. विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले भाविक हरिनामाच्या गजरात झपाझप पावलांना गती देतात आणि बघता बघता अवघड वाटणारी पंढरीची वाट सुकर करतात. पंढरीच्या वाटेवर वारकऱयांच्या पावलामागे पाऊल टाकत आपणही जावे असे अनेकदा वाटायचे. या ना त्या कारणाने या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले नव्हते. अखेर हा योग जुळून आला. वाखरी ते पंढरपूर हा अकरा किलोमीटरचा प्रवास करता आला. या प्रवासात रिंगण सोहळा तर अनुभवता आलाच, एवढेच नाही तर एका वारकऱ्याच्या सोबत एक रात्र एक दिवस मिळाला. चालता चालता झालेली भेट होती. आजपर्यंत कधी दिंडीत गेलो नव्हतो, ना कधी रिंगण पाहिले होते. तेथील अलौकिक आनंदाचा महिमा काय वर्णावा! पंढरीकडे जाणारे सर्वच रस्ते वारकऱयांच्या दिंड्यांनी गजबजलेले असतात. पंढरीच्या वाटेवर वेगवेगळ्या दिंड्यांत सहभागी झालेले वारकरी झपाझप पावले टाकत होते, तर कुणी थकले भागलेले वारकरी रस्त्याच्या कडेला हिरव्यागार झाडाखाली विसावले होते. वाखरीचा विशाल परिसर तर माऊलींच्या जयघोषाने टाळ-मृदंगाच्या घोषाने निनादत होता. सायंकाळच्या सुमारास सर्व पालख्यांनी विसाव्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्रस्थान ठेवले. सर्व मानाच्या पालख्यांचे जोरदार स्वागत केले. दिंडीत परभणी येथील हनमंतराव खटिंग यांचा दहा जणांचा ग्रुप होता. ज्ञानेश्वर माऊलींच्या रथामागे दोन नंबरच्या दिंडीत सहभागी झाले होते. वारीतच त्यांची चालता चालता ओळख झाली. रात्र त्यांच्या पथकासोबतच काढली. इथे सर्व काही शिस्तीत चालत असते. सकाळी सहा वाजता वारकरी पुढील प्रवासासाठी सज्ज होतात. यानिमित्ताने वेगळ्याच भावविश्वाची प्रचीती आली.

विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आणि भक्तिरसात बुडालेल्या दिंड्या, त्यांचे रिंगण, डौलदारपणे धावणारे अश्व हे वैभव बनले आहे. पंढरीच्या वारी सोहळ्यात संत तुकारामाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे आडवे-उभे असे सात रिंगण होत असतात. वाखरी येथे पालखी सोहळ्याचे शेवटचे आणि महत्त्वाचे रिंगण बघण्याचा योग आला. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी दोन्ही पालख्या एकत्र येतात. येथून पंढरपूर अवघे अकरा किलोमीटर अंतरावर. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या जयघोषाने लाखो भाविक वारकरी देहभान हरपून या अभूतपूर्व भक्तीसोहळ्यात एकरूप होतात. टाळमृदंगाचा गजर टिपेला पोहोचतो. तुकोबांचा अश्व जेव्हा मैदानाला शानदार फेरी मारतो, तेव्हा लाखो वारकऱयांच्या मुखांतून जयघोष बाहेर पडतो तो ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा. पालखी सोहळ्यास राजेशाही थाट व शिस्त आणण्यासाठी अश्वांना सहभागी केले जाते. पालखी सोहळ्यात माऊलींचे तीन गोल, तर तुकोबांचे चार गोल आणि आडवे रिंगण होतात. माढय़ाचे रिंगण तर खास असते. हाती पताका घेऊन एक जण बबलू अश्वावर स्वार होतो. रिंगणात भरधाव फेरी मारतो. त्याच्या मागे तुकोबांचा अश्व धावतो. त्याला मागे टाकले की रिंगण संपते. रिंगणात हरिनामाचा गजर टिपेला पोहोचलेला असतो. रिंगण सोहळा संपताच जो तो भाविक अश्वाच्या टापाखालची माती कपाळी लावतो तर कुणी ही पवित्र माती घरी, बागेत, शेतात टाकण्यासाठी घेऊन जातात.
माऊलींच्या जयघोषाने
गेले रिंगण रंगुनी… अश्व डोले रिंगणी
होता टाळमृदंगाचा ध्वनी…
अश्वांच्या दौडीने रिंगण
भक्तीचा कल्लोळ जाहला…
टापाखालची माती जो तो लावी कपाळी…
वाखरीच्या परिसरात ढगाळ पावसाळी वातावरण असते, त्यात मंद वाऱ्याची झुळूक येते. टाळमृदंगाचा गजर टिपेला पोहोचलेला असतो. ज्ञानोबा-तुकोबांच्या अखंड नामस्मरणात रात्र कधी होते आणि पहाटे कधी जाग येते ते कळतही नाही.

[email protected]