आठ हजार पोलिसांचा जागता पहारा,  पोलिसांना क्यूआर कोड, पोलीस अधीक्षकांचे ऑनलाईन लक्ष

आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱया लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी व वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी 8100च्या आसपास पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा जागता पहारा राहणार आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना ‘क्यूआर कोड’ देण्यात आला आहे. तसेच पोलीस नेमून दिलेल्या ठिकाणी काम करतात की नाहीत, यावर ऑनलाइन लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पंढरपूर शहरातील विविध ठिकाणची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, उपनिरीक्षक प्रशांत भागवत, सहायक निरीक्षक प्रकाश भुजबळ उपस्थित होते.

आषाढी एकादशीनिमित्त शहरात लाखो भाविक येणार आहेत. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर आलेल्या भाविकांना व्यवस्थित येता व जाता यावे, यासाठी शहरात पार्ंकगची ठिकाणे ठरविण्यात आली आहेत. काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य प्रकारचे वाहतुकीचे नियोजन केले आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱयांची त्याच ठिकाणावरून हजेरी घेण्यात येईल, तसेच त्याच ठिकाणी त्यांना ऑनलाइन पद्धतीने सूचना मिळतील. तसेच सध्या तो पोलीस कोणत्या ठिकाणी आहे, याची माहितीदेखील अधिकाऱयांना कळणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.

बॉम्बशोधक पथकांकडून मंदिराची तपासणी

यात्रेत कोणतीही अतिरेकी कारवाई होऊ नये, त्याचबरोबर कारवाई रोखता यावी, यासाठी सहा बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानक व मंदिर परिसराची बॉम्बशोधक पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे.