अवघी दुमदुमली पंढरी, वारकऱ्यांची विक्रमी गर्दी; विठ्ठल नामाचा गजर

>> सुनील उंबरे 

आषाढी एकादशीचा महासोहळा उद्या (17 रोजी) पंढरपुरात साजरा होत आहे. या महासोहळ्यासाठी पंढरीच्या दाहीदिशांनी वारकऱयांची रीघ लागली असून, शेकडो दिंडय़ा अन् पालख्या हरिनामाचा जयघोष करीत दाखल होत आहेत. एकादशीच्या पूर्वसंध्येला 12 लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगांचा मधुर निनाद, ‘ज्ञानोबा… तुकाराम…’चा आकाशाला गवसणी घालणारा अखंड नामघोष, जोशात फडकणाऱया भगव्या पताका… असे अवघे भक्तिमय वातावरण पंढरीत तयार झाले आहे. दरम्यान, पंढरीत दाखल होणाऱया वारकऱयांनी चंद्रभागेच्या स्नानासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली आहे. भाविक स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. सध्या पदस्पर्श दर्शनासाठी 16 ते 17 तास, तर मुखदर्शनासाठी पाच ते सहा तासांचा वेळ लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता महापूजा करण्यात येणार आहे.

सोमवारी सायंकाळी वाखरी मुक्कामी पोहोचलेले संतांचे पालखी सोहळे आज दुपारी 12नंतर पंढरीकडे मार्गस्थ झाले. संत नामदेव, संत मुक्ताबाई आदी प्रमुख संतांचे सोहळे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांच्या भेटीला आले. परंपरागत भेट व स्वागत झाल्यानंतर सर्व संतांचे सोहळे पंढरीकडे मार्गस्थ झाले. पंढरीच्या विसाव्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वारकऱयांचे हाल झाले. मात्र, उत्साह कायम होता. आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने वारकऱयांनी स्नान, नगरप्रदक्षिणा पूर्ण करून वारी पोहोचती केली.

यंदा भाविकांची संख्या विक्रमी आहे. एका मिनिटाला साधारणपणे 35 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे, तर तासाला दोन हजार भाविकांना दर्शन मिळत आहे. अनेक भाविक ‘व्हीआयपी’च्या नावाखाली मंदिर परिसरात गेटवर गर्दी करीत आहेत. ‘व्हीआयपी दर्शन’ बंद करण्यात आल्याने तथाकथित भाविक गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसून आले. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरांतील मठ, मंदिरे, भक्तनिवास ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. मठ-मंदिरांतून भाविक भजन, कीर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दर्शनरांग 7 कि.मी.पर्यंत

पायी वारीबरोबर वारकरी एसटी बस, रेल्वेगाडय़ा, तसेच खासगी वाहनांनी दाखल होत आहेत. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणामार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शनरांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर गेली आहे. मंदिरापासून सुमारे सात कि.मी. अंतरावर दर्शनरांग पोहोचली आहे. दर्शनरांगेत तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. भक्तिसागरात चार लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करीत आहेत. येथील तंबू, राहुटय़ांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.

शहरात 300 सीसीटीव्हींचा ‘वॉच’

चंद्रभागेत मुबलक पाणी सोडण्यात आले असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. तसेच या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोट्स तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱयांची करडी नजर भाविकांवर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्या वतीने आरोग्यविषयक सेवा बजाविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने वाखरी, तीन रस्ता, भक्तिसागर, गोपाळपूर दर्शनरांग येथे महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. येथेही लाखो भाविक औषधोपचारांचा लाभ घेत आहेत. एकूणच, वारकऱयांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारलेले दिसत आहे.