न्यायालयाचे आदेश असताना आणि स्वतः दिलेले आश्वासन राज्य सरकार पाळत नसल्यामुळे मुंबईत आरोग्यविषयक महत्त्वाचे काम करणाऱया ‘आशा’ आणि आरोग्य सेविकांनी आझाद मैदानात दोन दिवस आंदोलन करूनही पालिका पिंवा राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आशा-आरोग्य सेविका आक्रमक झाल्या असून आता सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्याचा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आरोग्य व आशा सेविका मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण काम त्या करतात. मात्र आजही त्या किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, जुनी पेन्शन आदी सुविधांपासून वंचित आहेत. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱया मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आशा-आरोग्य सेविकांनी गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन केले. दोन्ही दिवस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत बैठक झाली, मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली. दरम्यान, उद्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू असून मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा आरोग्य व आशा सेविकांनी दिला आहे.
अशा आहेत प्रलंबित मागण्या
आशा सेविकांना सहा हजार रुपये वेतन, दर महिन्याला 1 ते 10 तारखेदरम्यान वेतन मिळावे, आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर आशा सेविकांची नियुक्ती करण्यात यावी, किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन कायदा लागू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.