सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्सवर उल्हासनगर शहरात फरशीने हल्ला

 

क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करीत असलेल्या दोन आशा वर्कर्सवर माथेफिरूने फरशीने हल्ला केल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात घडला आहे. या हल्ल्यात दोन्ही आशा वर्कर्स जखमी झाल्या आहेत असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दोन आशा वर्कर्स मंगळवारी दुपारच्या सुमारास भरतनगर परिसरात क्षयरोग सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी फिरत होत्या. त्याचवेळी एका घरी त्या गेल्या असता तेथील व्यक्तीने बाहेरच्या अस्वच्छतेचा राग त्यांच्यावर काढून एका आशा वर्करच्या केसांना धरून तिच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला, तर दुसऱ्या आशा वर्करला नखांनी ओरबाडत मारहाण केली. या हल्ल्यात दोन्ही महिला जखमी झाल्या. त्यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून थेट शासकीय रुग्णालय गाठले.

• आशा वर्कर्स या नेहमीच आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या कामांची जबाबदारी पार पाडतात. प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आशा वर्कर्स या महिला असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी दिली आहे.

■ या प्रकरणात आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.