
>> आशा कबरे-मटाले
गणपतीच्या असोत वा देवींच्या, पाण्यात विसर्जित केल्या जाणाऱया मूर्तींची वेगाने वाढत चाललेली अफाट संख्या हा पर्यावरणाच्या ऱहासाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं सगळ्यांसाठीच घातक ठरेल.
‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ही आपली मागणी ध्यानात ठेवून दरवर्षी न चुकता भाद्रपद महिन्यात घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत विराजमान होणाऱया बाप्पाला आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिला. दीड दिवसांच्या, पाच दिवसांच्या, सात दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन त्याआधीच पार पडलं. गणेशोत्सव हे महाराष्ट्राचं भूषण. अभिमान वाटावा असा सांस्कृतिक ठेवा. बाप्पाचं आगमन झालं की घरात आगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. गणपतीसाठी गावी कोकणात जाणारे तर भाग्यवानच! तिथली मौज न्यारी म्हणून की काय, दरवर्षी प्रवासाच्या कितीही अडचणी आल्या तरी लाखोंच्या संख्येनं मंडळी कोकणात जातातच. ज्यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाचं न्यारं रूप पाहिलं नसेल, त्यांनी ‘कोकणी रानमाणूस‘चं तिथल्या गणेशोत्सवाविषयीचं अलीकडचं इन्स्टाग्रॅम रील अवश्य पाहावं. कोकणातला ‘साधेपणातला नैसर्गिक आनंद‘ हे तिथल्या उत्सवाचं वर्णन विचारात पाडतं. मातीचा गणपती पाण्यात विसर्जित होऊन ती माती पुन्हा निसर्गात मिसळावी हे गणेशोत्सवाचं मूळ स्वरूप आता कितपत उरलंय?
मुंबई महानगरीतला घरगुती गणपती निव्वळ ‘फ्लॅट संस्कृती’मुळे बदललेला नाही. गणेशमूर्ती आणणाऱया घरांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढते आहे. तीसएक वर्षांपूर्वी मुंबईत घरगुती गणेशोत्सव साधारणपणे निव्वळ मराठी कुटुंबांमध्ये साजरा होताना दिसे. गेल्या काही वर्षांत मात्र ‘अमराठी’ मंडळीही प्रचंड संख्येने गणपतीची मूर्ती घरी आणू लागली आहेत. सर्वसाधारणपणे मुंबई शहरात दोन-अडीच लाख गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात असाव्यात. पुणे शहरात ही संख्या साडेपाच लाख इतकी असल्याचं दिसतं. यावरून देशभरातील विसर्जित मूर्तींच्या संख्येचा अंदाज येतो. खरे तर दरवर्षी ही आकडेवारी शाडू की पीओपी, आकार आदी तपशीलांसह जाहीर व्हायला हवी. तलाव, नदी व समुद्राखेरीज आता कृत्रिम तलावांमध्येही मूर्ती विसर्जित होताना दिसतात. परंतु कृत्रिम तलावांतील सारं काही अखेर समुद्रातच टाकलं जातं हेही समोर आलं आहे. मूर्तींची प्रचंड संख्या, त्यात होत चाललेली वाढ ध्यानात घेतली आणि हे सारं प्रतिवर्षी समुद्राच्या तळाशी जमा होणार आहे हे गांभीर्याने विचारात घेतलं तरी यातून समुद्रजीवनाच्या होणाऱया प्रचंड हानीचं प्रमाण लक्षात येऊ शकेल.
गेली काही वर्षं दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की ‘पीओपींच्या मूर्तींवर बंदी आहे… नाही’ याच्या बातम्या झळकू लागतात. न्यायालयही ‘बंदी आहे वा नाही’ याची चर्चा करतं. परंतु प्रत्यक्षात बाहेर काहीच बदलत नाही. प्रचंड संख्येनं विसर्जित होणाऱया आणि पाण्यात विरघळायला बराच वेळ घेणाऱया प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे सागरी जीवनाची हानी होते, पर्यावरणाचा हा ऱहास उद्या आपल्यासाठीच घातक ठरणार हे पटलेली मोजकी मंडळी शाडूच्या म्हणजे मातीच्या मूर्तींचा आग्रह धरत आहेत. सुजाण कुटुंबांमधून मूर्तीचा आकारही लहान ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. या मंडळींना कुठल्याही औपचारिक मनाई आदेशाची गरज पडलेली नाही. पण उर्वरित बहुतांश जनतेला मात्र अद्याप पर्यावरणाच्या ऱहासाशी काही देणंघेणं दिसत नाही. ‘शहाणपण देगा देवा-यंदा गणपतीला… मातीचं दान मातीला’ या अशा सरकारी जाहिरात मोहिमांची गरज या मंडळींसाठीच आहे. मूर्तींची उंची कमी ठेवणं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक करावं का, पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणावी का याविषयावरची निव्वळ चर्चाच पुढेही काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. मूर्ती, सजावटीचं सामान यातून होणारं पर्यावरणाचं नुकसान सर्वसामान्यांना नीटसं कळलेलं नसताना कुठलंही बंधन, नियम वरून लादणं अवघडच जाणार. म्हणूनच प्रदूषण मंडळांनी तसे निर्णय यापूर्वी घेतले असले तरी त्यांचं अस्तित्व कागदोपत्रीच दिसतं. 2020 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या मूर्तींना मनाई करणारा आदेश काढला. पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा प्रश्न मूर्तीकारांच्या उत्पन्नाशीही निगडित आहे. पीओपीच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात तयार करणं सोपं जातं. या मूर्ती शाडूच्या मूर्तींपेक्षा अधिक मजबूत आणि स्वस्तही असल्यामुळे मागणीही त्यांनाच जास्त असते.
एकीकडे कोणतीच मनाई प्रत्यक्षात येत नसताना गणेशोत्सव मंडळं आणि घरगुती गणपती या दोघांचीही संख्या प्रतिवर्षी वेगाने वाढते आहे. म्हणजेच पर्यावरणाची हानी दरवर्षी वाढत चालली आहे. नाही म्हणायला, थोडाफार सकारात्मक बदल इतकाच की सजावटीतला थर्माकोलचा वापर काहिसा कमी झालेला दिसतो. हे जागरुकतेमुळेच घडलं. त्यामुळेच यासंदर्भात जागरूकतेसाठीच सार्वत्रिक प्रयत्न व्हायला हवेत. सरकारी जाहिरातींचा प्रभाव व्यापक असेल. परंतु समाजमाध्यमांमार्फत तरुणाई आणि शाळकरी मुलांची मानसिकता पर्यावरणप्रेमी घडली तरी बदलासाठी आवश्यक परिस्थिती तयार होण्यास मदत होईल. मूर्ती तयार होण्याच्या आधी, मूर्तींची मागणी नोंदवली जाण्याआधीच जागरूकता मोहिमेतून लोकांना मातीच्या लहान मूर्तींकडे वळवलं पाहिजे. सजावटीची सामग्री इको-फ्रेंडली ठेवणं, त्यात प्लास्टिकचा वापर टाळणं, सार्वजनिक गणेशोत्सवांनी दोन मूर्ती ठेवणं टाळणं यांसारखे छोटे-छोटे बदलही पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत करू शकतात.
आता गणेशोत्सवापाठोपाठ देवीच्या मूर्ती आणणाऱयांची संख्याही वाढते आहे. हे सारं कुठे तरी रोखलं पाहिजे. धार्मिक चालीरीती या देवाने नव्हे तर तुम्ही-आम्हीच निर्माण केल्या आहेत. त्यातून निसर्गाची हानी होत असेल तर ते देवालाही कसं पसंत पडणार? अर्थात अलीकडे त्यावरही ‘तुम्हाला फक्त आमच्याच सणांमधील त्रुटी दिसतात का’ असा उलटा सवाल केला जातो. पर्यावरणाची हानी कुणीही केली तरी परिणाम सर्वांना भोगावे लागतील, हे एव्हाना हवामानातील बदलांतून खरं तर पुरतं स्पष्ट होतंच आहे. बाकी त्या सृष्टीनियंत्याने, बाप्पाने निर्मिलेली ही सृष्टी जपण्याची बुद्धीही त्या गणनायकानेच सगळ्यांना द्यावी…