मागोवा – 2025 साठीचं ‘मॅनिफेस्टिंग’!

>> आशा कबरे-मटाले

केंब्रिज डिक्शनरीने काही दिवसांपूर्वी ‘मॅनिफेस्ट’ या शब्दाची 2024 चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून निवड केली. खूप वापरला, धुंडाळला जाणारा, तसंच एखाद्या वर्षात जगभरात नेमकं काय सुरू होतं हे प्रातिनिधिकदृष्टय़ा दर्शवणारा शब्द ते या किताबासाठी निवडतात.

वर्ष 2024 संपून अवघे चारच दिवस झाले आहेत. 2025 अद्यापही सकाळच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे लखलखीत, ताजं, नवं भासत आहे. अजूनही अवतीभवती ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या उत्फुल्ल, उत्सवी सजावटी आहेत. हा उत्सवी माहौलच नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आपल्या मनांना स्पर्शून, तिथे आनंद अन् उमेदीची पेरणी करून जातो. तसं पाहिलं तर डिसेंबर सुरू होताच नकळत आपण मागे वळून सरलेल्या वर्षाचा आढावा घेऊ लागतो. काय-काय घडलं या वर्षात? कसं गेलं हे वर्ष? पण जसजशी वर्षअखेर समीप येते, तसं हे मागे वळून पाहणंही मागेच पडतं. आपल्याला नव्या वर्षाचे वेध लागतात. कसं असेल येणारं वर्ष? काय घेऊन येईल आपल्यासाठी?

या प्रश्नाच्या उत्तरावर मात्र सरल्या वर्षाची छाया असते. किमान काही काळ तरी. आपल्या वयानुरूप नव्या वर्षाच्या उत्साही स्वागताचा जोश थोडाबहुत कमी होत जातो. अनेक पावसाळे पाहिलेल्या मंडळींची धारणा काहीशी करकरीत, व्यवहारी असते. काय फरक पडणार आहे नव्या वर्षाने? आयुष्य आहे तसंच मागील पानावरून पुढे सुरू राहील असा सूर त्यांच्याकडून लागतो. पण कुमारवयीन वा तरुणांची मने उमेदीने भरलेली दिसतात. नवा काळ आनंदी घटना-घडामोडी घेऊन येईल अशा आशावादी दृष्टीने ते पुढे पाहात असतात. अर्थात या फरकाला कारणही तसंच असतं. कारण या लहानग्या अथवा तरुण मंडळींच्या जगण्याच्या व्यावहारिक गरजांचा भार वडीलधारी मंडळी वाहतात. ‘आटे-दाल का भाव’ या वडीलधाऱयांनाच कळत असतो व त्यामुळेच चिंताही प्रौढांच्या वाटय़ालाच अधिक असतात. तर अगदी सहज मागे वळून पाहिलं तरी सरल्या वर्षातल्या कुठल्या घटना-घडामोडी आजही चटकन आठवतात?

भारतात 2024 हे लोकसभा निवडणुकांचं वर्ष होतं. महाराष्ट्रात तर विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. जगभरातील एकंदर 60 देशांमध्ये 2024 मध्ये निवडणुका पार पडल्याने जगातली जवळपास निम्मी लोकसंख्या त्या वर्षात निवडणुकांना सामोरी गेली. म्हणजे काय-काय अनुभवलं असेल जगातल्या निम्म्या लोकसंख्येने याची सहज कल्पना करता येते! यात अर्थातच अमेरिकेसारख्या बलशाली महासत्तेच्या अध्यक्षीय निवडणुकांचा उल्लेख करावा लागेल. तेथील निवडणुकांमध्ये यंदा मूळच्या भारतीय वंशाच्या, पण आता अमेरिकेचे नागरिक बनलेल्यांची मतं ‘स्विंग स्टेट्स’मध्ये निर्णायक ठरली. त्यामुळे एकंदरच अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीयांचा बोलबाला होता. जगभरात उजवी विचारसरणी प्रबळ होताना दिसतेय असं निरीक्षणही आता सगळीकडेच नोंदलं जातंय. भविष्यात याचे परिणाम अवघ्या जगाला सोसावे लागतील.

निवडणुकांखेरीज लष्करी, सशस्त्र संघर्षही 2024 मध्ये जागतिक पटलावर ठळकपणे समोर राहिला. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध तिसऱया वर्षीही सुरूच राहिलं, तर इस्रायल-हमास युद्ध भोवतीच्या देशांमध्येही पसरलं. याचेही परिणाम जग सोसतं आहेच.जगभरात 2024 मध्ये नैसर्गिक संकटांचं स्वरूप आणखी तीव्र झालेलं दिसून आलं. त्यामुळे हवामान बदलासंदर्भातील चिंता गडद झाल्या आहेत.

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर अनेक क्षेत्रांमध्ये आपलं अस्तित्व दाखवू लागला. शाळकरी मुलं ‘चॅट जीपीटी’ अथवा ‘मेटा एआय’कडून हवा तो मजकूर लिहून घेऊ लागली आणि हे तंत्रज्ञान आपल्या जगण्याचा भाग होताना दिसू लागलंय. येत्या काळात एआयचे मानवी जीवनावरचे परिणाम सर्वात मोठे असणार आहेत. जगभरात आर्थिक शक्ती मोजक्या लोकांच्या हातात एकवटून विषमतेची दरी रुंदावते आहे हेही दिसते आहेच.

या साऱ्या घडामोडींचं सावट 2025 वर असणार आहे. म्हणूनच मनामनांत जाणता-अजाणता अस्थैर्याची चिंता आहे. आजच्या घडीला जगात सर्वात गडद भावना कुठली असेल तर ती ही ‘चिंतेची’ किंवा ‘आशंके’चीच असावी बहुतेक. अवतीभवतीच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही अशी आशंका वाटू लागली की, मानवी मन अज्ञातात आधार शोधतं. 2024 मध्ये जगभरातील अनेक जण बहुधा अशा आधाराकडे वळले असावेत. म्हणूनच की काय, केंब्रिज डिक्शनरीच्या वेबसाइटवर 2024 मध्ये सर्वाधिक धुंडाळला गेलेला शब्द ‘मॅनिफेस्ट’ हा होता व म्हणूनच तो त्या वर्षीचा ‘वर्ड ऑफ द इयर’ ठरला! आधी विशिष्ट वर्गाकडून मर्यादित प्रमाणात वापरला जाणारा हा शब्द 2024 मध्ये मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्येही खूप वापरला गेला. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या यशामागे ‘मॅनिफेस्टिंग’ असल्याचं बोलून दाखवलं. समाज माध्यमांवर ‘हॅशटॅग मॅनिफेस्ट’ जोडलेल्या लाखो पोस्ट आणि व्हिडीओंचा सुळसुळाट झाला.

मॅनिफेस्ट म्हणजे काय, तर आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त केल्याची कल्पना करणं, असं अगदी मनापासून केल्याने ती गोष्ट खरोखरच प्राप्त होण्याची शक्यता वाढते असं मानणं. यासाठी तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते मात्र अगदी सुस्पष्ट असावं लागतं आणि आकांक्षा करताना चित्तही संपूर्ण एकाग्र. शाहरुख खानचा एक डायलॉग फार गाजला होता, ‘कहते है, अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानें की कोशिश में लग जाती है.’ या डायलॉगमध्ये जे सांगितलंय ते ‘मॅनिफेस्टिंग’च आहे.

तर, तूर्तास जगातील असंख्य लोक आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी (बहुधा प्रयत्नांसोबतच) या मॅनिफेस्टिंगचाही आधार घेतायत असं दिसतंय. अर्थात मॅनिफेस्टिंगचा हा ट्रेंड तसा विवादास्पदच आहे. कारण ‘मॅनिफेस्टिंग’ची खरंच काही मदत होते का, हे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेलं नाही. आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर माणसाने यापूर्वीही केवढे मोठाले आधार निर्माण केले आहेत. या आधारांना विज्ञानाचे समर्थन लाभत नसेल कदाचित, पण त्यामुळे माणसं त्यांचा आधार घ्यायचं थांबवत नाहीत. झालीच तर झाली याचीही मदत म्हणून बहुधा लोक अशा गोष्टींकडे वळत असावेत. तर चला, 2025 ला सामोरं जाताना आपणही ‘मॅनिफेस्ट’ करू, की हे वर्ष आपल्याला सगळ्यांनाच खूप आनंदाचं, शांती आणि समाधानाचं, तसंच समृद्धीचं जाईल. हॅप्पी 2025!

[email protected]